महसूल मंत्र्यांच्या हस्ते संगमनेर शहरात सीसीटीव्ही प्रकल्पाचा शनिवारी शुभारंभ !
संपूर्ण शहरात ३९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

प्रतिनिधी —
संगमनेर शहरात वाढणारी लोकसंख्या व वाहनांची वर्दळ यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून संगमनेर शहरात अद्यावत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली असून या सुरक्षारक्षण प्रकल्पाचा व कंट्रोल रूमचा शुभारंभ शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली आहे.

संगमनेर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे व प्रगतशील शहर असून यामध्ये दररोज येणार्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. वाहनांची गर्दी, भरलेली बाजारपेठ यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टी थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून संगमनेर शहरात ३९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामधील ३ कॅमेरे हे पीटूझेड असून ३६० अंशात नियंत्रण करत आहेत.
तालुका पातळीवर होणारा हा राज्यातील पहिलाच अभिनव प्रकल्प आहे. असून या प्रकल्प व कंट्रोल रूमचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय या ठिकाणी होणार आहे.

यावेळी दुर्गाताई तांबे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी तहसील कार्यालयात डिजिटल सातबारा व ऑनलाईन लोकाभिमुख महसूल माहिती कक्षाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी मान्यवर यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर पोलिस प्रशासन व तहसील विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
