पिंपळे पाझर तलावातून दोन गावांसाठी पाणी सोडले

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाची तातडीची कार्यवाही; शेतकऱ्यांना दिलासा

संगमनेर / प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील पाझर तलावातून चिंचोली गुरव आणि पारेगाव या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी सोडण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर तात्काळ ही कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चिंचोली गुरव व पारेगाव परिसरातील शेती पाण्याअभावी धोक्यात आली होती. रब्बी हंगामातील पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, यावर्षी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे या तलावातून दोन्ही गावांसाठी तात्काळ रब्बी आवर्तन सोडावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रविदास सोनवणे तसेच पारेगाव येथील भाजपचे सुरेश दळवी यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पिंपळे पाझर तलावातून चिंचोली गुरव व पारेगाव येथील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने शुक्रवारी, दिनांक ९ जानेवारी रोजी पिंपळे पाझर तलावातून वरील दोन्ही गावांसाठी पाणी सोडले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, रविदास सोनवणे, दगेश सोनवणे, सचिन आभाळे, बाबासाहेब माळी, खंडेराव सोनवणे, संभाजी सोनवणे, आबा सोनवणे, अमोल सोनवणे, रमण गडाख, सुरेश गडाख, किशोर गडाख यांच्यासह चिंचोली गुरव व पारेगाव येथील शेतकरी उपस्थित होते. पाणी उपलब्ध झाल्यामुळे दोन्ही गावांतील रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!