केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान
यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क मुंबई —

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा शेतकरी, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी नव्या संधी यांना समर्पित असून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या शेतकरी व ग्रामीण विकासाच्या धोरणांची माहिती ते देणार आहेत.

३१ डिसेंबर रोजी श्री. चौहान अहिल्यानगर येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान ते बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन शेतकरी गटांशी संवाद साधणार आहेत. तसेच शेतकरी व ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करून आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना ते पीक पद्धती, सिंचन, जलसंधारण, पीक विमा, बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत विचारमंथन करणार आहेत. अहिल्यानगर दौऱ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक विविधीकरण, मूल्यवर्धन तसेच शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यांच्या माध्यमातून संघटित शेतीला चालना देण्याबाबत आपली भूमिका यावेळी मांडतील.

१ जानेवारी २०२६ रोजी श्री. चौहान वृक्षारोपण करून शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेणार आहेत. सकाळी १० ते ११ या वेळेत नववर्षाच्या निमित्ताने ते आपल्या दोन्ही मंत्रालयांतील अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करून विशेष संकल्प देणार असून आगामी वर्षातील कामकाजासाठी दिशा-निर्देश देतील. दुपारी २ वाजता ते शिर्डी जवळील लोणी बुद्रक येथे आयोजित ग्रामसभेत सहभागी होऊन ग्रामस्थ, मजूर व श्रमिक बांधवांशी संवाद साधणार आहेत. तसेच सायंकाळी ते शनी शिंगणापूर येथे दर्शन घेणार आहेत.

२ जानेवारी रोजी नाशिक येथे श्री. चौहान यांचा कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२.१५ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सौजन्य भेटीनंतर सभागृहात औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ते मार्गदर्शन करणार असून, प्रश्नोत्तर व संवादात्मक सत्राद्वारे विद्यार्थी व संशोधकांशी थेट संवाद साधणार आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!