अमृतवाहिनीत 9 जानेवारीपासून कळस कृषी व डेअरी प्रदर्शन….

संगमनेर प्रतिनिधी — 

राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कळस कृषी व डेअरी प्रदर्शन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या परिसरात 9 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व समन्वयक सागर वाकचौरे यांनी दिली आहे.

अमृतवाहिनीच्या थोरात कृषी महाविद्यालयाच्या वेल्हाळे शिवारात होत असलेल्या भव्य कृषी व डेअरी प्रदर्शनाबाबत माहिती देताना अनिल शिंदे व सागर वाकचौरे म्हणाले की, अमृतवाहिनी संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कळस कृषी व डेअरी प्रदर्शन 2026 महाविद्यालयाच्या वेल्हाळे शिवारात होत आहे.

या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वा. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे.

9 ते 13 जानेवारी या पाच दिवसात होणाऱ्या या प्रदर्शनात 40 एकर परिसरामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पाच एकर परिसरात 69 पिकांच्या 350 जातींची पिके उभारण्यात आली आहे यामध्ये ज्वारी, गहू ,हरभरा, ढोबळी मिरची, कारले, दोडके, शेवंती, झेंडू, कांदा ,मका यांसह विविध पिकांचा समावेश आहे. याचबरोबर महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरता वुमन बिझनेस एक्सपो होत असून बाजूला फूड एक्सपोर्टचा स्टॉल उभारण्यात आला आहे. या समवेत नॅशनल एज्युकेशन एक्सपो, मशिनरी व ऑटो एक्सपो, कृषी व डेअरी स्टॉल, मल्टिनॅशनल कंपन्यांचे स्टॉल, पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन यांचा समावेश आहे.

चाळीस एकर परिसरामध्ये विविध कंपार्टमेंट करण्यात आले असून विविध तज्ञांचे मार्गदर्शन करण्यासाठी भव्य व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील व देशातील विविध कृषी तज्ञ सहभागी होणार आहेत.

तरी अमृतवाहिनी च्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या वतीने होत असलेल्या कळस कृषी व डेअरी प्रदर्शन 2026 ला नागरिक युवक व महिलांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन अमृतवाहिनी शिक्षण संस्था, छत्रपती युवा प्रतिष्ठान, व थोरात कृषी महाविद्यालयाच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.

प्रदर्शनात भव्य एक्सपो

कृषी प्रदर्शनानिमित्त देशातील विविध कृषी तंत्रज्ञ मार्गदर्शन करणार असून मल्टिनॅशनल कंपन्यांचे विविध स्टॉल उभारण्यात आले आहे. याचबरोबर एज्युकेशन एक्सपो मशनरी व ऑटोमोबाईल एक्सपो पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन अशा विविध गोष्टींचा समावेश असलेल्या या भव्य प्रदर्शनाची जय्यत तयारी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!