प्राथमिक शिक्षणाबरोबर संगणकाचे ज्ञानग्रहण करणे काळाची गरज ;  डॉ. संजय मालपाणी

सावरगावतळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन

प्रतिनिधी —

प्राथमिक शिक्षणाबरोबर संगणकाचे ज्ञानग्रहण करणे काळाची गरज आहे असे सांगतानाच धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि विविध आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी बौद्धिक संपदा बरोबरच शरीरसंपदा मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी सावरगावतळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित केलेल्या संगणक कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

या प्रसंगी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.रवींद्र ताशिलदार, सावरगाव तळ चे सरपंच दशरथ गाडे, उपसरपंच शिवाजी थिटमे, पोलीस पाटील गोरक्षनाथ नेहे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंकर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.मालपाणी पुढे म्हणाले की, संगमनेर महाविद्यालय, आय आय टी दिल्ली आणि मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत भारत अभियान हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत संगमनेर महाविद्यालयाने उत्साहाने सहभागी होऊन सावरगाव तळ मध्ये विविध विकास कामे हाती घेतली आहेत. यामध्ये प्राथमिक शाळेत संगणक कक्ष उभारणे, देवराई उभारणे, जैवविविधता संवर्धनासाठी मदत करणे अशा प्रकारच्या योजना संगमनेर महाविद्यालय सावरगाव तर मध्ये राबवत आहे.

योग आणि प्राणायाम हे आपल्या आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करायला हवेत त्याच बरोबर दीर्घ श्वासाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना ताठ बसण्याचे फायदे सांगितले. दररोज सूर्यनमस्कार केले तर तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याला सुद्धा फायदा होईल व तुमचे जीवन सकारात्मक होण्यास मदत होईल असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी संगणकीय युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः ला अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करून उभ्या राहिलेल्या संगणक कक्षा चा वापर पुरेपूर करण्याचे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड म्हणाले की, शहरातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने स्पर्धा करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान ग्रहण करून उच्च पदावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे सावरगाव तळचं ग्रामस्थांचे कौतुक करून यापुढेही महाविद्यालय सावरगावतळ मध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.

ग्रामस्थांनी दिलेल्या संगणक कक्षा बद्दल महाविद्यालयाचे आभार मानले व सत्कार केला. सदर उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवरांचे सत्कार आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये संगणक कक्षासाठी लोकवर्गणी मध्ये भरीव सहभाग असणाऱ्या मान्यवरांचा समावेश होता.

त्यानंतर पाणी फाउंडेशन च्या पुरस्काराबद्दल सावरगाव तळ च्या ग्रामस्थांचे सत्कार करण्यात आले. सावरगाव तळ येथील संगमनेर महाविद्यालयाचा विद्यार्थी अशोक थिटेमे याचाही रिपब्लिक डे परेड साठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सावरगाव तळ येथील कुंभार कडा याठिकाणी वनराई महाविद्यालय उन्नत भारत अभियानआतून उभारणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनराईचे उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमनेर महाविद्यालय उन्नत भारत कक्षाचे समन्वयक डॉ. अशोक तांबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तळ येथील कडलग सर, जाधव सर यांनी मेहनत घेतली.

सदर उद्घाटनप्रसंगी सावरगाव तळे येथील विविध मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक अशोक तांबे यांनी केले तर सूत्रसंचालन जाधव सर आणि कडलग सर यांनी केले. सावरगाव तळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथील शिक्षक वर्ग प्रवरा माध्यमिक विद्यालय सावरगाव तळ येथील शिक्षक वृंद श्री विवेकानंद जागृती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सावरगाव तळ येथील पाणी फाउंडेशन समिती गावचे सन्माननीय ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!