संगमनेर महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी —
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई यांच्या पूर्णाकृती धातूच्या पुतळ्याचे दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या उद्घाटनाचे औचित्य साधून विद्यार्थी विकास मंडळामार्फत महाविद्यालयांमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई महोत्सव साजरा करण्यात आला, या अनुषंगाने संगमनेर महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा कालावधीमध्ये ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

क्रांतिज्योती सावित्री महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. यावेळेस महाविद्यालयातील विद्यार्थिनी संध्या कोटकर टी वाय बीएस्सी मायक्रो बायोलॉजी या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित गाणे सादर केले.
प्राचार्य गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये स्थापन होणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याची माहिती दिली. तसेच सावित्रीबाई फुले यांना शैक्षणिक कार्य करताना कोणत्या समस्या आल्या आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढून एक आदर्श शिक्षक आणि शिक्षकतज्ञ म्हणून कसे कार्य केले याविषयीची माहिती उपस्थितांना दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये प्रो.डॉ. सुवर्णा बेनके (संशोधन समन्वयक, विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग) यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सावित्रीबाई यांना सावित्रीआई असे संबोधले आणि त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा सुरुवातीपासूनचा गोषवारा घेतला. शाळेमध्ये ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी जात असताना सनातनी लोकांकडून त्यांना झालेला त्रास, त्यांचे हे शैक्षणिक कार्य बंद करण्यासाठी फुले दाम्पत्यांना घर सोडावे लागले. कोणत्याही दबावाला बळी न पडता फुले दांपत्यांनी आपले ज्ञानदानाचे कार्य पुढे वाढवतच नेले याचा सारीपाठ सादर केला.
शैक्षणिक कार्याबरोबरच अनाथ महिलांच्या सेवेसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली, बालहत्या प्रतिबंधक गृह व विधवा आश्रमाची स्थापना केली, मोफत वसतिगृह, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला करणे, शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी रात्रीची शाळा इत्यादी कार्यक्रमांचा वृत्तान्त उपस्थितांसमोर मांडला. या कार्यक्रमामध्ये १०५ विद्यार्थी सहभागी झाले.

महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीचा वापर करून सावित्रीबाई यांच्या कार्यावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जितेंद्र पाटील व प्राध्यापिका डॉ. राजेश्वरी ओझा यांनी केले. या स्पर्धेमध्ये ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉ. दिपक गपले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील व प्रा. हेमलता तारे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ. नरेंद्र फटांगरे यांनी मानले.
