संगमनेर शहरात नायलॉन मांजाचा धुमाकूळ !

मुले स्त्रिया वयस्कर नागरिक जखमी होण्याचे प्रकार वाढले 

पोलिसांच्या कारवाईबाबत साशंकता 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने कागदोपत्री प्रेस नोट काढून नायलॉन माझ्यावर बंदी घातली आहे. आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेश दिले असले तरी संगमनेर मध्ये मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आदेशांचे पालन होते की नाही हा संशोधनाचा विषय ठरला आहे. नायलॉन मांजाने संगमनेरात कहर केला असून पतंग उडवणाऱ्या मंडळींनी या मांजाचा सर्रास वापर केल्याने बऱ्याच जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले असून संगमनेर पोलीस नायलॉन मांजावरची कारवाई गांभीर्याने घेत नसल्याचे यातून समोर आले आहे. 

मकर संक्रांति काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या कालावधीमध्ये सर्वत्र पतंग उडवण्याचे उत्सव साजरे केले जातात. ही पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर केला जातोय. हा मांजा धोकादायक असून या मांज्यामुळे अनेकांना मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. काहींच्या गळ्याला चिरले गेले आहे. काहींच्या हातावर नाकावर तोंडावर मांज्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. अनेकांना रुग्णालयात उपचार देखील घ्यावे लागले आहेत. जखमी झालेल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली नसली तरी या प्रकाराला सर्वजण वैतागले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांकडून केली जात नसल्याचे समोर आले आहे.

शहरातील विविध उपनगरात आणि महत्त्वाच्या ठिकाणी देखील अशा घटना घडल्या आहेत. जोर्वे नाका परिसरात एका सायकल चालकाचा पाय कापला गेला असल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका स्त्रीचा हात देखील कापला गेला असल्याची माहिती मिळाली आहे. नाईकवाडपुरा या भागातून मोटार सायकल वरून हुजेब रौफ शेख (वय 23 वर्ष राहणार नाईकवाडपुरा संगमनेर) हा तरुण त्याच्या बहिणीला ट्युशन साठी नेत असताना अचानक नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात गुंतला व त्यांनी मान फिरवल्यामुळे त्याचा कान व गळा चिरला गेला आहे व मोठी दुखापत त्याला झाली आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

अशा या घटना घडल्यामुळे शहरांमध्ये नायलॉन मांजाची उघडपणे विक्री होत असल्याचे समोर आले आहे. पतंगबाजी करणारे याकडे दुर्लक्ष करतात, तर अशा प्रकारचा मांजा विकणारे देखील पोलीस आणि कायदेशीर कारवाईला न घाबरता सर्रासपणे अवैध मांजाची विक्री करताना दिसतात.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!