जयहिंद लोकचळवळीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे वुईथ गांधीज थॉट..!!

जयहिंद कडून गांधीजींच्या विचारांवर प्रेम करण्याचा दिन साजरा

 प्रतिनिधी —

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने निरोगी व निकोप समाज निर्मितीचे कार्य सुरू असून तरुणाई मधून साजरे होणारे विविध डे ऐवजी व्हॅलेंटाईन डे निमित्त गांधीजींच्या विचारावर प्रेम करण्याचा संदेश देत व्हॅलेंटाईन डे विथ गांधीजी थॉट हा अभिनव उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला, पेमगिरी, वेल्हाळे, पारेगाव बु. बोटा, अकलापूर, खरशिंदे, घारगाव,कुरकुंडी, देवकौठे या विविध ठिकाणी व्हॅलेंटाईन डे वीथ गांधीजी थॉट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ सुधीर तांबे, गांधी विचारांचे प्रचारक संकेत मुनोत, दुर्गाताई तांबे, मिलिंद कानवडे, विलास कवडे, साहेबराव कवडे, साई संस्थानचे विश्वस्त सुहास आहेर, सरपंच अर्चना शेळके, मिनानाथ शेळके, मिलिंद औटी, प्रा. बाबा खरात, प्रा गणेश गुंजाळ, विरेश नवले यांसह जयहिंद चे विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध गावांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गांधीजींच्या विचारांची प्रेरणा व प्रेम जागृत करण्याचे काम करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, जगाला शांततेचा मंत्र देणारे महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रपुरुष होते. त्यांनी सत्य व अहिंसाच्या मंत्रातून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. आज ज्या वेळेस जगामध्ये अशांतता निर्माण होते त्यावेळेस गांधीजींचे विचार हे शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या विचारातून मार्टिन ल्युथर किंग, मलाला, नेल्सन मंडेला,बराक ओबामा आदींनी जगभरात शांततेतून मोठी क्रांती केली आहे. सध्या तरुणाई सोशल मीडियामुळे वेगळ्या दिशेकडे जात आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. मुलांनी मोबाईल ऐवजी मैदानाकडे वळले पाहिजे. आणि अशा अस्थिर जगामध्ये गांधीजींचे विचार जोपासले पाहिजे. कुटुंबामध्ये, गावांमध्ये,राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार हे मौलिक असल्याने जयहिंद लोकचळवळीच्या वतीने व्हॅलेंटाईन डे विथ गांधीजी थॉट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येईल असे ते म्हणाले.

तर गांधी विचारांचे प्रसारक संकेत मुनोत म्हणाले की, अनेक जण अज्ञानातून गांधीजींवर टीका करतात. टीका करण्यापूर्वी त्यांनी गांधीजी विचार आणि आपण करणारी टिका ही समजून घेतली पाहिजे. जगाला शांततेचा संदेश देणार्‍या गांधीजींनी सत्य व अहिंसातून दाखवलेले धैर्य हे वीर पुरुषांचे आहे. अनेक जाती -धर्मांमध्ये विभागलेला भारत देश गांधीजीने एका छत्राखाली आणला. लोकचळवळी तून बलाढय ब्रिटिश सरकारचा पराभव केला. गांधीजींच्या चळवळीत तळागाळातील माणूस सहभागी झाला म्हणून गांधीजींनी चळवळ हि संपूर्ण देशाची चळवळ झाली. आज पुन्हा या विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मिलिंद कानवडे, विलास कवडे, प्रा. बाबा खरात आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या विचारांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तर सत्य वागेल, स्वच्छता राखेल, मनभेद करणार नाही अशा शपथा विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!