आता… संगमनेर भूमी अभिलेख कार्यालय खाजगी कर्मचार्यांच्या ताब्यात !
होतोय लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारचा आरोप

राष्ट्रीय छावा संघटनेचे उपसंचालकांना निवेदन…
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष
प्रतिनिधी —

संगमनेर मधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात खासगी लोकांचा राबता असल्याचा आरोप झाल्यानंतर आता संगमनेर भूमी अभिलेख कार्यालयात देखील खाजगी लोकांनी ताबा घेतला असून त्याठिकाणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रीय छावा संघटनेने केला आहे. यासंदर्भात नाशिक येथील उपसंचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
संगमनेर भूमी अभिलेख कार्यालयात मोठा अनागोंदी कारभार चालू आहे, या कार्यालयामध्ये सात ते आठ खाजगी कर्मचाऱ्यांनी ताबा घेतला असून सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत.
या खाजगी कर्मचाऱ्यांना त्वरित हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिला आहे.

संगमनेर भूमी अभिलेख कार्यालया विषयी वारंवार तक्रारी करून देखील कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नाही. या ठिकाणी खाजगी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत. या कर्मचाऱ्यांना कुठलाही शासनादेश नसताना, कुठेलेही कंत्राटी कामगार घेण्याची आदेश नसताना शासकीय खुर्चीवर बसण्याची परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने दिली ? त्यांना वेतन कशाप्रकारे दिले जाते ? या कर्मचाऱ्यांना कुणाच्या आशीर्वादाने इथे ठेवले आहे? याची चौकशी व्हावी.

या कार्यालयात हे खाजगी कर्मचारी अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून शासकीय कागदपत्र छेडछाड करत आहेत, स्वतःच्या मर्जीप्रमाणे आर्थिक तडजोडी करून नवीन रेकॉर्ड करून देत आहेत. व त्यातूनच शेतकऱ्यांना बाहेरच्या बाहेर भेटून आर्थिक तडजोडी केल्या जातात. अगदी रेकॉर्ड रूम मधील दस्तऐवज, सरकारी कागदपत्रे घरापर्यंत नेली जातात, बऱ्याच रेकॉर्ड फाईली गायब आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांनी स्वतंत्र लेखा परीक्षण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवारी देखील हे खाजगी कर्मचारी कार्यालयात येतात. इथल्या दप्तराची तपासणी करण्यात यावी तसेच नवीन कागदपत्र बनवण्याचे आदेश कोणत्या अधिकारी यांना दिली याची चौकशी व्हावी. या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास त्या सर्व बाबू उघड होतील.
सध्या या कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकारी पहात असल्यामुळे या खाजगी कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावते. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. हे कर्मचारी कोणालाही घाबरत नसल्याचे दिसून येते. आणि या सगळ्या प्रकाराला या कार्यात असणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे.

भुमिअभिलेख कार्यालयाचा कारभार किती बोगस पणे चालू आहे हे दिसून येते. त्यामुळे या कार्यालयाची चौकशी करावी व येथील खाजगी कर्मचाऱ्यांना त्वरित काढून टाकावे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रवीण कानवडे, तालुकाध्यक्ष गणेश गुंजाळ जिल्हा संपर्कप्रमुख दिनकर घुले उपाध्यक्ष बाळासाहेब कानवडे, अजय गुंजाळ कार्यकर्त्यांनी दिला आहे.
