राजुर येथे सकल आदिवासी समाजाचा सन्मान मोर्चा
आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे मूर्ती विटंबना प्रकरण
राजुर दिनांक 14 विलास तुपे —
आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या झालेल्या अवमान प्रकरणी शनिवारी राजुर येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निषेध सभेमध्ये युवा नेते अमित भांगरे व भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी दोषी व्यक्तींना पाठीशी न घालता तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज एकत्र आला. राजुर व शेंडी हे गाव निषेध म्हणून पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.

अकोले तालुक्यातील देवगाव येथील आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची बुधवारी अजित नवले व शैलेंद्र पांडे या दोन ठेकेदारांकडून विटंबना करण्यात आली होती. त्यामुळे राजुर येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने अमित भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड हेही सहभागी झाले होते.
सकाळी ११ वाजता स्वर्गीय मधुकर पिचड यांच्या बंगल्यापासून हा निषेध मोर्चा निघून राजुर पोलीस स्टेशनला सदर मोर्चाचे रूपांतर रास्ता रोको आंदोलनात झाले. हे आंदोलन तीन तास सुरू होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या झालेल्या अवमनाबद्दल आदिवासी बांधवांनी या निषेध सभेमध्ये आपला रोज व्यक्त करत दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

सभेमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून ॲट्रॉसिटी चा गुन्हा हा प्रशासनाने लावला असल्याची माहिती यावेळी अमित भांगरे यांनी दिली. तर सदर स्मारकाची ठेकेदारांकडून झालेला विटंबना प्रकार हा दुसऱ्याच्या सांगण्यावरून झाला असल्याचे आरोप या सभेमध्ये करण्यात आले. ज्या ठेकेदारांकडून स्मारकाचे नुकसान करण्यात आले आहे त्यांचे फोन कॉल तपासण्यात येऊन तांत्रिक विश्लेषणावरून तपास करुन प्रमुख आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
ज्या ठिकाणी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी पिचड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आपणच सदर स्मारकाच्या विटंबनेला कारणीभूत असून या अधिकाऱ्यांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी केली. तर ज्या ठेकेदारांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा प्रशासनाने दाखल केला असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी अमित भांगरे यांनी सांगितले.

सर्व प्रकाराची पोलीस प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने शहानिशा करून तातडीने दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तर आठ दिवसांमध्ये स्मारकाचे काम पूर्ववत करून द्यावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, अकोले तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता तुळशीराम डोईफोडे, तसेच राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
सदर निषेध सभेमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड, अमित भांगरे, दिलीप भांगरे, राजुर गटाच्या माजी जि प सदस्या सुनिता भांगरे, विजय भांगरे, स्वप्निल धांडे, पोपट चौधरी, भरत गाणे, सुनिल सारुक्ते, मुरली आण्णा भांगरे, पांडुरंग खाडे, यांच्यासह असंख्य आदिवासी बांधव सामील झाले होते.
