आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याचा सर्व बाजूंनी कसून तपास — अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे
आरोपी प्रसाद गुंजाळ यास चार दिवसांची पोलीस कोठडी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना मारहाण करीत त्यांच्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी प्रसाद गुंजाळ यास चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा सर्व बाजूंनी कसून तपास करण्यात येणार असल्याचे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवासारख्या संवेदनशील काळात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करीत त्यांना मारहाण करण्यात आली होती. यामध्ये प्रमुख आरोपी गुंजाळ यास पोलिसांनी पकडले आहे. घटनास्थळी त्याला मारहाण झाली होती. त्यानंतर शहरात आणि तालुक्यात शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली होती.

आज संगमनेर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. मात्र अद्याप पर्यंत आमदार खताळ यांना मारहाण कोणत्या कारणाने करण्यात आली हे मुख्य कारण पुढे आलेले नाही. संगमनेर काँग्रेस सह काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी पुढाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. तसेच सोशल मीडियावर देखील सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी देखील या घटनेचा निषेध केला असून या प्रकरणाची वस्तुस्थिती आणि सत्य समोर आणावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार खताळ यांच्यावरील हल्याबाबत संशयास्पद वातावरण असले तरी या हल्ल्याच्या मागे कोण आहे ? सूत्रधार कोण आहे ? नेमके कारण काय आहे ? याचाही तपास होऊन जनतेसमोर येईलच. हल्ल्या मागच्या सत्य कारणाविषयी तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चा आहेत. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळण्यासाठी पोलिसांनीच या संदर्भात संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी म्हटले आहे की, पोलीस गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास करत आहे. आरोपीला कोणी चिथावणी दिली किंवा कसे? आरोपी कोणाच्या संपर्कात होता? अन्य कोणी साथीदार आहेत किंवा कसे? या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांवरून तपास करण्यात येत आहे.
