बनावट नोटांची विक्री करणारी टोळी पकडली !

एक कोटीच्या बनावट नोटांसह आरोपी जेरबंद…

 एक आरोपी संगमनेरचा…. 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात ख-या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी एक कोटीच्या बनावट नोटासह जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात खालील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मोबाईल द्वारे माहिती मिळाली की, दौंड कडून नगर शहराकडे एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इरटीगा क्र. MH-12- SU.-2317, आणि सिलव्हर रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडीमध्ये काही इसम व एका मोटार सायकल वर दोन इसम असे त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी, व्यवहार करण्याकरीता येत आहे.

कबाडी यांनी गुन्हे शाखेचे पथक सपोनि/ हरिष भोये व पोहेकॉ/सुनिल पवार, सुरेश माळी, दिपक घाटकर, हदय घोडके, पोना/ भिमराज किसन खर्से, पोकॉ/ आकाश काळे, अमोल कोतकर, बाळु खेडकर, मनोज साखरे, चालक सफौ/उमाकांत गावडे यांना कळविल्यानंतर नगर दौंड रोडवरील कायनेटीक चौकापासून दौंड रोडने सुमारे 200 मी.अंतरावरील हनुमान मंदिराचे जवळ सापळा रचून दौंड कडून येणाऱ्या सदर गाड्या थांबवल्या.

मारुती सुझुकी इरटीगा नंबर MH-12- SU.-2317 मध्ये असलेले 1) इंद्रजित बिबीशन पवार वय 29 रा. शांतीनगर, भोसरी, ता.हवेली, जि. पुणे (2) दिपक राजेंद्र भांडारकर वय 32 रा. शांतीनगर, भोसरी ता. हवेली,जि. पुणे (3) शरद सुरेश शिंदे वय 29 रा. वरंवडी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले व त्याच वेळी मोटार सायकल वरील दोन इसम व स्विप्टगाडीमधील 3 इसम पळून गेले.

आरोपी व चारचाकी वाहनाची झडती घेऊन एकुण 9 लाख 57 हजार रुपये किमतीच्या भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसनाऱ्या 500 रु. दराच्या 12 नोटा व त्याखाली भारतीय बच्चो का बैंक 500 रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा असलेले 12 बंडल, तसेच 88 भारतीय बच्चो का बैंक, 500 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, तसेच 20 भारतीय बच्चो का बैंक 200 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, एक मारुती सुझुकी इरटिका गाडी, एक टीव्हीएस स्टार कंपनीची मोटार सायकल व 04 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पळून गेलेल्या पैकी एकाचे नाव (1) जितेंद्र ममता साठे (रा. वासुदे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) असे आहे. व तसेच त्यांची एक गॅग असून ते नेहमी बनावट नोटा बाळगून त्या खऱ्या आहेत असे लोकांना भासवून त्यांना बनावट नोटा देवुन आर्थिक व्यवहार करुन फसवणुक करत होते. दोन दिवसापुर्वी कोपरगांव जि. अहिल्यानगर येथे सुमारे 7 लाख रुपये किमंतीच्या बनावट नोटा दिल्या असल्याचे समोर आले आहे. आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 179, 180,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे. तरी अशा प्रकारे कोणाची फसवणुक झाली असले, तर त्यांनी संबधीत पोलीस स्टेशनला तक्रारी देण्याचे अहवान करण्यात येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!