संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी कासारा दुमाला समनापुर राजापूर आदी गावांमधील जमिनीवरील चुकीच्या नोंदी रद्द होणार !
महसूल मंत्री बावनकुळे यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले..
आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दिनांक 6
संगमनेरमधील गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर, राजापूर व अन्य भागांतील अनेक शेतकरी व गोरगरीब नागरिक गेल्या ५० ते ६० वर्षांपासून एका गंभीर अन्यायाला सामोरे जात होते. त्यांच्या जमिनी, घरांच्या जागा, शेतजमीन आणि राहत्या मिळकतींवर “पोकळीस्त” व “इतर हक्कांतील कब्जेदार” म्हणून अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या.

या नोंदींमुळे संबंधित नागरिकांना बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र, कायदेशीर व्यवहार, पाणी-जोडणी, घरपट्टी, नळपट्टीसह सर्व नागरी सुविधांपासून वंचित राहावं लागत होतं. तसेच, शेतजमिनीच्या नोंदी न झाल्यामुळे काही परिवारात देखील वाद होत होते. तर काहींना तर धमक्याही दिल्या जात होत्या.

सदर अन्यायाविरोधात संबंधित नागरिकांनी आमदार अमोल धोंडिबा खताळ यांच्याकडे निवेदने सादर केली. याची तात्काळ दखल घेत आमदार खताळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध निवेदनांद्वारे समस्या सविस्तर मांडली असून संबंधित नोंदी रद्द करून मूळ ताबेदारांना न्याय मिळावा यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली.

गुंजाळवाडी गट क्र. ७९, ९२, कासारा दुमाला गट क्र. ३२, ३६, ३७, ३२,३८, समनापूर – गट क्र. ५६, राजापूर – गट क्र. २८,३८,३०
मंत्री बावनकुळे सकारात्मक प्रतिसाद
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित जमिनीवरील अनधिकृत व पोकळीस्त नोंदींबाबत तातडीने यासंदर्भात बैठक बोलावली आहे. यामुळे संबंधित रहिवाशांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आमदार खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा याप्रकरणी लक्ष घातले असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. या भेटीत मंत्री बावनकुळे यांनी सर्व माहिती कागदपत्रे मागवून अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन विषय लवकर मार्गी लावणार आहे, असे आश्वासन दिले.
