मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण !

लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञतेच्या भावना

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  —

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना अपघात, कॅन्सर, गुडघा, मणक्यांची शस्त्रक्रिया, हृदयरोग अशा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वेळेवर मिळालेली आर्थिक मदत जीवदान देणारी ठरली आहे. जिल्हा स्तरावर कक्ष सुरू झाल्याने प्रक्रिया सुलभ झाली असून, गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळत आहे. या निधीमुळे उपचार सुरू होऊन अनेकांचे प्राण वाचले आहेत. लाभार्थ्यांचा अनुभव सकारात्मक असून, ही योजना म्हणजे आमच्या आयुष्यातील आशेचा किरण, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांत पाचशेहून अधिक रुग्णांना ४ कोटींपेक्षा जास्त निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत देण्यात आली आहे. सर्वप्रथम, रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालय मदत योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या योजनांची माहिती दिली जाते व लाभ मिळवण्यास सहकार्य केले जाते. जर रुग्णाला कोणत्याही योजनेमधून लाभ मिळत नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून लाभ मिळवून दिला जातो.

कर्जत तालुक्यातील आळसुडे येथील राजेंद्र खरात यांना या निधीच्या माध्यमातून १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. या मदतीतून त्यांच्या एका मांडीच्या सांध्याचे ऑपरेशन झाले. अर्ज केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मदतीची रक्कम दवाखान्याच्या बँक खात्यात जमा झाली. त्यामुळे सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आली नाही. *“या योजनेमुळे आम्हाला मोठा आर्थिक हातभार लागला”*, अशी प्रतिक्रिया रुग्णाचे भाऊ दिलीप खरात यांनी दिली.

अहिल्यानगर येथील रेखा जोरवेकर यांचे पती सतीश जोरवेकर यांना मेंदूच्या आजाराच्या उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत मिळाली. यामुळे खासगी रुग्णालयात दर्जेदार उपचार करणे शक्य झाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची माहिती गरीब व गरजू रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा श्रीमती जोरवेकर यांनी व्यक्त केली.

शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथील काकासाहेब फरताळे यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात गुडघ्याचे ऑपरेशन झाले. अहिल्यानगर येथील कक्षात अर्ज केल्यानंतर तीन दिवसांतच ५० हजार रुपयांची मदत मिळाली. या मदतीमुळे शेती गहाण ठेवून पैसे उभारण्याची गरज पडली नाही. खरोखर ही योजना गरीब व गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे मुलगा अमोल फरताळे यांनी दिली.

अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील भाऊसाहेब सुर्यभान शेवाळे यांना पॅरॅलिसिसच्या उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत मिळाली. “मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत मिळाली नसती तर मित्रपरिवाराकडून पैसे उसने घ्यावे लागले असते. या योजनेमुळे खासगी रुग्णालयात प्रभावी उपचार घेता आले”, असे मुलगा सचिन शेवाळे यांनी सांगितले.

१ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू झाल्यानंतर मदतीच्या प्रमाणात जवळपास चारपट वाढ झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर दोन दिवसांत अर्ज दाखल करून कागदपत्रे पूर्ण असल्यास, पाच दिवसांतच निधी संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. सध्या जिल्ह्यातील १०५ नोंदणीकृत रुग्णालयांमधून हा निधी मिळवता येतो. कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी कार्यरत असून, नागरिकांनी थेट येथे संपर्क साधावा, असे आवाहन या कक्षाचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!