श्रावण मासानिमित्त कीर्तन, व्याख्यानांचे आयोजन
२ ते ४ ऑगस्ट : राजस्थान युवक मंडळाचा उपक्रम
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 29
पवित्र श्रावण मासानिमित्त येत्या शनिवारी दि.२ ऑगस्ट पासून राजस्थान युवक मंडळाच्या वतीने तीन दिवसांच्या धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यक्रमांना तीनही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

श्रावण महिन्याच्या पावन पर्वकाळाचे औचित्य साधून मागील काही वर्षांपासून सातत्याने मंडळाच्या वतीने तीन दिवसीय उपक्रमाचे आयोजन केले जात असते.
शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५रोजी सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत बुलढाणा येथील प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि. ३ ऑगस्ट व सोमवार दिनांक ४ ऑगस्ट असे सलग दोन दिवस सायंकाळी ७ ते ८ :३० या वेळेत प्रेरक व्याख्याते आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी यांचे “ विषादातून विवेकाकडे : ज्ञानेश्वरी भाव यात्रा ”या विषयावर व्याख्यान होणार आहे. मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड, संगमनेर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. सर्वांसाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था असणार आहे. कार्यक्रम बरोबर वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपेल त्यामुळे श्रोत्यांनी वेळेच्या अगोदर दहा मिनिटे उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

२०२५ हे मंडळाच्या अमृतमहोत्सवाचे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी अनेक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष सुमित अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार , सचिव कल्पेश मर्दा, सहसचिव कृष्ण असावा, खजिनदार प्रतीक पोफळे, सहखजिनदार वेणुगोपाल कलंत्री यांनी दिली असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य कार्यरत आहेत.
