रस्ता लुट करणारी टोळी जेरबंद !
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 29
प्रवाशाला कार मध्ये लिफ्ट देऊन चाकूचा व शस्त्राचा धाक दाखवत त्यांची रस्त्यावर लूट करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. यातील दोघांनी नेवासा तालुक्यात एका प्रवाशाची लूट केली होती. 6 लाख 500 रुपयांच्या मुद्देमालासह या टोळीला पकडण्यात आले आहे.

धर्मनाथ टिकाराम जोहरे (वय ४३ वर्षे, व्यवसाय खासगी नोकरी, रा. गारखेडा परिसर, ता. जि. छ. संभाजीनगर) या पिडीत इसमाने यासंदर्भात फिर्याद दिली होती. पथकातील अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून यातील आरोपींना पकडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील पोउपनि / राजेंद्र वाघ, पोलीसअंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे.

गुन्ह्यात वापरलेल्या कारने भेंडा येथून आरोपी नेवासा फाटा कडे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर माहिती आधारे नागापूर फाटा कमानीजवळ सापळा रचून सदरची कार अडवुन कारमधील १) महेश आबासाहेब शिरसाठ (वय २६ वर्षे, रा. म्हसले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर,) २) गौरव शहादेव शिरसाठ (वय – २५ वर्षे, रा. सदर) या दोघांना पकडले.
आरोपींच्या ताब्यातुन व कारच्या झडतीमध्ये गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, वापरलेली कार, चाकू असा एकूण 6 लाख 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
