सफाई कामगारांचा गटारीत गुदमरून मृत्यू….. ठेकेदारांना काळ्या यादीत टाका —  

आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर भूमिगत गटारीच्या साफसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांचा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, आणि हलगर्जीपणामुळे अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधान सभेत केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना शासनाने भरीव स्वरूपात आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

गटारीतील मैला हाताने साफ करण्यास प्रतिबंध आणि पुनर्वसन करणारा २०१५ चा कायदा अस्तित्वात असतानाही संबंधित ठेकेदाराने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सुरक्षा उपाययोजना पूर्णतः धाब्यावर बसविल्या. चेंबरमधील मैला साफ करण्याचे काम यंत्रसामग्रीच्या साह्याने करणे गरजेचे असताना त्या ठेकेदाराने अतुल पवार यास कोणती ही सुरक्षा उपकरणे न देता त्याला चेंबरमध्ये उतरवले.

चेंबरमधील विषारी वायूमुळे पवार यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचविण्या साठी गेलेला रियाज यालाही जीव गमवावा लागला. या घटनेमुळे या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर संगमनेर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी, भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आमदार खताळ यांनी विधानसभेत केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!