संगमनेर पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना छोटे-मोठे चोर सापडतात !
पण ‘मटका, गुटखा आणि गांजावाले किंग’ कधीच सापडत नाहीत !!
नेमके गौडबंगाल काय….

प्रतिनिधी —
संगमनेर शहर आणि तालुक्यात पोलिसांना कधीकधी मोटार सायकल चोर, गंठण चोर, टीव्ही चोर व भुरटे चोर सापडतात. त्यांच्याकडून माहिती मिळवून एखाद-दुसरी टोळी सुद्धा सापडते. त्याची प्रसिद्धी केली जाते. समाज माध्यमातून त्यावर बातम्या देखील येतात. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होते.
परंतु याच पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना संगमनेर शहर आणि तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे मात्र सापडत नाहीत. अशी टीका नागरिकांमधून होत आहे.

विशेषतः मटका, जुगार, गांजा आणि गुटखा विक्री यासह वाळूतस्करी बाबत पोलिसांना संगमनेर शहर व तालुक्यात काहीही सापडत नाही. हे अवैध धंदे वर्षानुवर्ष बिनदिक्कतपणे चालू आहेत.
संगमनेर शहरात स्थानिक पोलिसांनी विविध ठिकाणी छापे घालून चोरांना पकडले किंवा पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने छापे घालून चोरट्यांना पकडले याच्या बातम्या मात्र जोरात होतात. नगरची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा देखील चोरट्यांना पकडते. परंतु मटका आणि इतर अवैध धंदे मात्र सुरक्षित राहतात.

या धंद्यांमध्ये नगर जिल्ह्यात संगमनेर एक नंबर वर आहे. “मटका” या मोठ्या अवैध धंद्या बरोबरच गांजा आणि गुटखा तस्करीची राजधानी म्हणून संगमनेर ओळखले जाते. शहर आणि तालुका हद्दीत हे धंदे राजरोसपणे सुरु आहेत.
संगमनेर तालुक्यात संगमनेर शहर, संगमनेर ग्रामीण, घारगाव आणि आश्वी असे चार पोलीस स्टेशन आहेत. शिवाय संगमनेरला उपअधीक्षक दर्जाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देखील आहे. तरीही मटका, जुगार गुटखा आणि वाळू तस्करी हे अवैध धंदे तेजीत सुरू असतात.

पंधरा दिवसातून, महिन्यातून एखादा साखळी चोर पकडायचा, मोटरसायकल चोर पकडायचा आणि त्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात देऊन पोलिसी कारवाईचा डंका पिटायचा असे चित्र सर्वसामान्य नेहमीच पाहावयास मिळते, परंतु या अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई करून या धंद्याचे ‘किंग’ पकडल्याची बातमी कधीच पाहायला मिळत नाही असे नागरिक बोलतात.
संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध माध्यमांनी याठिकाणी चालणाऱ्या अवैध धंद्यांना वेळोवेळी वाचा फोडून देखील त्यावर मात्र कारवाई होताना दिसत नाही. कत्तलखान्या सारखा महाराष्ट्रात गाजलेला अवैध धंदा सुरक्षितपणे गुपचुप सुरू असतो. संगमनेर बाहेरचे पोलीस अधिकारी येऊन कधी कधी त्या ठिकाणी छापेमारी करतात. परंतु नंतर परिस्थिती जैसे थे असते.

एकंदरीत पोलिसांच्या सर्व कारवाया पाहता हे चलती असणारे चार-पाच अवैध धंदे कायमस्वरूपी सुरू असतात. यामध्ये राजकीय पुढाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांचे सुद्धा लागेबांधे असल्याचे बोलले जाते. सातत्याने कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे समाज माध्यमांनी, प्रसिद्धीमाध्यमांनी कितीही आवाज उठवला तरी पोलिसांच्या मनात या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची इच्छाच नसल्याने मटका, जुगार, गुटखा आणि वाळू तस्करी हे अवैध धंदे सुसंस्कृत आणि त्याच बरोबर संस्कारित असलेल्या संगमनेरात राजरोसपणे कायमस्वरूपी चालूच राहणार आहेत.

