बनावट नोटांचे महाराष्ट्रातील मोठे रॅकेट उघड ; तीन आरोपी ताब्यात
70 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर पोलीस आणि राहुरी पोलिसांनी एकत्रितरित्या महाराष्ट्रातील बनावट नोटा बनवण्याचे मोठे रॅकेट उघड केले असून सोलापूर येथून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 70 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आला आहे. यामध्ये बनावट नोटा, नोटा बनवण्याचे मशीन आणि इतर साहित्य देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीची माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस पथक राहुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, तिन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन नंबर MH 45 Y 4833 मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरी कडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत. पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून तीन संशयित इसम
1) पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार(वय 33 वर्ष राहणार सोलापूर) 2) राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय 42 रा. कर्जत जिल्हा अहिल्यानगर) 3) तात्या विश्वनाथ हजारे (वय 40 रा. पाटेगाव तालुका कर्जत) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या.

सदर नोटा तपासल्या असत्या त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवतो असे सांगितल्याने
सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना करून शितलनगर, टेंभुर्णी, जिल्हा सोलापूर येथे समाधान गुरव यांचे इमारतीत आरोपीने घर भाड्याने घेतलेले असून तेथे
1 ) xerox करण्याची
मशीन व प्रिंटर 2 ) कटिंग करण्याची मशीन 3 ) नोटा बनवण्यासाठी चा कागद 4 ) नोटा
मोजण्याचे मशीन 5) लॅमिनेशन मशीन 6) कंट्रोलर युनिट (सर्व मशिनरीची किंमत सुमारे
पाच लाख रुपये)
7) पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल ज्याची किंमत 37,50,000 रुपये
8) दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा चे एकूण 44 बंडल ज्याची किंमत 8,80,000 रुपये
9) पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंट मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स (18,00,000
रुपये किमतीचे) अशा सर्व 70,73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं 724 / 2025 भारतीय न्याय संहिता कलम -179,180, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. सदर आरोपीविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर येथे गुरनं नंबर 503/2022 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी हे 22 महिने तुरुंगात होते.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि संदिप मुरकुटे, पोहेकॉ सुरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदिप ठाणगे, पोकॉ. सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदिम शेख पथकाने केली असुन सदर पथकास सपोनि सुदाम शिरसाट, पोउपनि राजु जाधव, पोहेकॉ. साळवे, शिंदे, पोकॉ. पाखरे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनर यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि संदिप मुरकुटे हे करत आहेत.
