संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा !
2 हजार 700 किलो गोमांससह 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 30
संगमनेर शहर आणि तालुका पोलीस कितीही दावा करीत असले तरी संगमनेरातील अवैधकत्तलखान्यांमधून गोवंश कत्तली राजरोसपणे सुरू असून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या मोठ्या कारवाईतून संगमनेर पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात 2 हजार 700 किलो वंश मांसासह 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचे पितळ उघडे पडले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळसाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे आधी कर्म कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पथकाद्वारे संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरू होती. हे पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, जमजम कॉलनी, 09 नं.गल्ली, संगमनेर येथे हाजी मुदस्सर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे त्यांच्या पत्र्याच्या गोडावून मध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत.. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकला असता 08 ते 09 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले. पथक कारवाई करत असताना संशयीत इसम हे आडोश्याचा फायदा घेऊन पळून गेले.

पथकाने घटनाठिकाणावरून 34 लाख 84 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यात 2 हजार 700 किलो गोमांस, 2 महिंद्रा बोलेरो पिकअप, 1 अशोक लेलंड कंपनीचा बडा दोस्त, 5 दुचाकी वाहन, 4 इलेक्ट्रीक वजन काटे, लोखंडी सुरा व लोखंडी कुऱ्हाड व 02 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

घटनाठिकाणवरून पळून गेलेले इसम व गोवंश जनावराची कत्तल करण्याच्या व्यवसायाबाबत विचारपूस करून 1) हाजी मुदस्सर कुरेशी, रा.संगमनेर, जि.अहिल्यानगर (फरार) 2) नवाज जावेद कुरेशी, रा.संगमनेर, जि.अहिल्यानगर (फरार) 3) फईम कुरेशी, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही (फरार) 4) अक्रम कुरेशी, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही (फरार) 5) समीर कुरेशी, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही (फरार) व इतर 4 ते 5 अज्ञात इसमांविरूध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुरनं 600/2025 बीएनएस कलम 271, 325, 3 (5), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
