संगमनेर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा !
सराईत जुगार अड्डा चालक जाळ्यात
सुमारे सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 23
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या इशाऱ्यानंतर आणि आदेशानंतर ॲक्शन मोडवर आलेल्या संगमनेर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सुरू केली आहे. सुरुवातीला दोन मोठ्या मटका पेढ्या चालकांवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी आता आपला मोर्चा जुगार अड्ड्यांकडे वळवला असून संगमनेर खुर्द येथे छापा टाकत सराईत जुगार अड्डा चालकाला जाळ्यात पकडले आहे. त्याचबरोबर सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.

सराईत जुगाड अड्डा चालक अनिल एकनाथ राक्षे याच्यासह शिवाजी छबू चव्हाण, श्याम दामोदर बेल्हेकर, वाहिद अजिज पठाण, राजेंद्र तुकाराम जोर्वेकर, सुरज प्रताप कतारी, संपत रमेश पवार, तुळशीराम दादा वाळुंज, अक्षय पंढरीनाथ वाघमारे, अक्षय उर्फ मोबी कतारी आदी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात आत्माराम दत्तात्रय पवार पोलीस कॉन्स्टेबल संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दली आहे. आरोपींकडून 28 हजार 200 रुपये रोख रक्कम, 3 लाख 65 हजार रुपये किमतीच्या विविध मोटरसायकली, एक लाख 18 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि जुगार मटक्याचे साहित्य असा सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपी हे संगमनेर खुर्द येथे प्रवरा नदीच्या मोठ्या पुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा हारजीतचा जुगार खेळताना, खेळवताना आढळून आले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर अभंग हे तपास करीत आहेत.
