संगमनेरात मोठी कारवाई !
मटका किंगचे पाठीराखे उघड !!
गांजा गुटखा जुगार अड्ड्यांवर कारवाई कधी ?
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 21
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडक इशाऱ्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी एकाच दिवशी मटका अड्ड्यांवर मोठी कारवाई करीत मटका धंद्यातल्या राजाश्रय लाभलेल्या मोठ्या असामींवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक आरोपी निघाल्याने या मटका अड्डा चालवणाऱ्या किंगचे पाठीराखे कोण असा सवाल उपस्थित झाला असून आरोपींचे भाऊबंद आणि नातेवाईक सत्ताधारी राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या पदांवर असून राजकीय चर्चेची आणि संशयाची सुई आता त्यांच्याकडे फिरली आहे.


नव्याने आलेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची आणि उपविभागीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत अवैध धंदे बंद करण्याचा सज्जड इशारा दिला होता. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत असे निदर्शनास येईल तेथील प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. अवैध धंद्यांवर कारवाई करून तातडीने ते बंद करावेत असे आदेश दिले होते.

शुक्रवारी संध्याकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून तब्बल 35 जणांवर गुन्हा दाखल केला असून 10 लाख 46 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक जण आरोपी करण्यात आलेले आहेत.

यातील कोल्हेवाडी रोड संगमनेर या परिसरात मटका अड्ड्यांवर छापा टाकून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये
अशरफ समशेर अली सय्यद (रा. जहागीरदार वाडा, तीन बत्ती, संगमनेर) नावेद अशरफ सय्यद, आयन साजिद सय्यद (रा. कोल्हेवाडी रोड संगमनेर) नजाकत समशेर अली सय्यद (तीन बत्ती चौक, संगमनेर) हुसनेन रौफ पटेल (रा. अलका नगर संगमनेर) रियाज बापू मिया देशमुख (रा.तीन बत्ती संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

या आरोपींकडून रोख रक्कम, विविध प्रकारच्या मोटार सायकल, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, मटका खेळण्याचे साहित्य असे एकूण 3 लाख 10 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संतोष सोपान बाचकर, पोलीस शिपाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

तर शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या तेली खुंट परिसरात छापा टाकून शंकर भागप्पा (रा. तेली खुंट चौक संगमनेर) दत्तात्रय भागप्पा इटप, नानासाहेब बापू जाधव (रा. रायते संगमनेर) सुरज रामसिंग ताम्रकर (रा. पंपिंग स्टेशन संगमनेर) अण्णासाहेब कुंडलिक खताळ (रा.धांदरफळ संगमनेर) रवींद्र नंदराम फासे (रा. माळीवाडा संगमनेर) हौशीराम रामभाऊ कहांडळ (रा. सावर चोळ संगमनेर) इकबाल बशीर शेख (रा. गवंडीपुरा संगमनेर) शेखर भास्कर जाधव (रा. घुलेवाडी संगमनेर) नानासाहेब भिमराज उकिरडे (रा. निळवंडे संगमनेर) रामदास गणपत माळी (रा. रायते संगमनेर) कैलास बाबुराव जाधव (रा. खांडगाव संगमनेर) शिवाजी दत्तू सातपुते (रा. कुरण रोड संगमनेर) राजू रामनाथ झांबरे (रा. उपासनी गल्ली संगमनेर) मधुकर नामदेव भोर (रा. घुलेवाडी संगमनेर) बाळासाहेब कारभारी पवार (रा. ओझर संगमनेर) भाऊसाहेब नाना काळे (रा. आनंदवाडी संगमनेर) शंकर संजय सवारगे (रा. वैदवाडी संगमनेर) गणेश बाबुराव सरोदे (रा. देवी गल्ली संगमनेर) दगडू रामचंद्र पवार (रा.कनोली संगमनेर) दत्तू तुकाराम अनाप (रा. कसारा दुमाला संगमनेर) असलम सुलतान शेख (रा. समनापुर संगमनेर) हरिभाऊ बबन पवार (रा. निळवंडे संगमनेर) मनोहर काशिनाथ अभंग (रा. माताडे मळा संगमनेर) संभाजी किसन साळवे (रा. निमगाव जाळी संगमनेर) सुदर्शन दत्तात्रय इटप, सोमनाथ शिवदास यादव (रा. कवठे कमळेश्वर संगमनेर) विश्वनाथ नाना अल्हाट (रा. पंपिंग स्टेशन संगमनेर) सुभाष सिताराम खैरे (रा. जोर्वे संगमनेर) अशा 29 जणांवर गुन्हा दाखल केला असून या छाप्यात 7 लाख 35 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम दत्तात्रय पवार यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.

संगमनेरात अवैध धंद्यांचे पाठीराखे उघड ?
या मोठ्या कारवाईनंतर संगमनेर शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांचे छुपे राजकीय पाठीराखे उघड झाले असल्याचे बोलले जात असून या मोठ्या छाप्यानंतर काही राजकीय नेत्यांकडे संशयाची सुई फिरली असून त्यांच्या नावाविषयी चर्चा सुरू आहे. राजकीय सत्तेचा वापर करून अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात असल्याचे देखील बोलले जात आहे. यामध्ये मटका जुगार गुटखा वाळू गौण खनिज तस्करी त्याचबरोबर बॉल गेम लोटो अवैध सावकारकी अवैध दारू विक्री गांजा विक्री सारखे प्रकार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या सर्वांना राजकीय आशीर्वाद असल्याचा थेट आरोप होत आहे.
