श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा !
कष्टकरी पालकांना मानाचा मुजरा
रोटरी क्लब ऑफ संगमनेरचा प्रेरणादायी प्रकल्प
संगमनेर प्रतिनिधी दि. २ –
आयुष्यभर कष्ट करून आपल्या पाल्यांना यशाच्या शिखरावर नेणाऱ्या पालकांच्या संघर्षाला सलाम करत रोटरी क्लब ऑफ संगमनेरतर्फे “श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मालपाणी लॉन्स येथे अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे गव्हर्नर सुरेश साबू होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिथयश उद्योजक राजेश मालपाणी, विनोद पटणी, राजेंद्र अग्रवाल, रविंद्र बनकर उपस्थित होते.

कार्यक्रमात जीवनाच्या अडचणींवर मात करत आपल्या मुलांना यशस्वी घडवणाऱ्या पाच कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. या पालकांच्या मुलांनी प्रशासन, राजस्व, पोलिस, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यावेळी भाऊसाहेब फटांगरे, अपर जिल्हाधिकारी, पालघर यांच्या मातोश्री भागीरथीबाई गंगाधर फटांगरे, एकनाथ अभंग, जॉइंट कमिशनर, इन्कम टॅक्स, मुंबई यांच्या मातोश्री रुक्मिणीताई गणपत अभंग, मंगेश खिलारी, आयपीएस अधिकारी यांचे पालक संगिता पाराजी खिलारी, मनिषा भालके, प्रॉडक्शन मॅनेजर, महिंद्रा कंपनी यांनी पालक सिता व बबन भालके आणि डॉ. ताईबाई गावडे, स्त्रीरोग तज्ज्ञ, एम.डी. (गोल्ड मेडलिस्ट) यांचे पालक सिंधुबाई व देवराम गावडे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत सादर करून करण्यात आली. राजेंद्र खोसे यांनी आपल्या सुमधुर आवाजात हे गीत सादर केले. सन्मानित पाल्यांनी आपल्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या संघर्षाच्या आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या.
प्रमुख भाषणात राजेश मालपाणी म्हणाले, “आई-वडील हेच खरे गुरु आहेत. त्यांच्या कष्टांचा आणि मार्गदर्शनाचा आदर केल्यास कोणतेही यश गाठता येते.” तर सुरेश साबू यांनी एकलव्य आणि द्रोणाचार्य या उदाहरणाद्वारे गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले यावेळी त्यांनी संगमनेर रोटरी क्लबच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष साईनाथ साबळे, विश्वनाथ मालाणी, विकास लावरे, महेश वाकचौरे, प्रकल्प प्रमुख सुनिल घुले, महेश जाजू, राजेंद्र खोसे, नरेंद्र चांडक, दीपक मणियार, अजित काकडे, रविंद्र पवार, संजय लाहोटी, अरविंद कासट, पवन कुमार वर्मा, डॉ. विनायक नागरे, योगेश गाडे, आनंद हासे, डॉ.किशोर पोखरकर, अमित पवार, संतोष आहेर, संकेत काजळे, रवि ढेरंगे, प्रमोद मणियार, ओंकार सोमाणी, मधुसूदन करावा, सचिन पलोड रोहित नावंदर, सौरभ म्हाळस, मनमोहन वर्मा, मनोरमा साबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राठी व भारतभूषण नावंदर यांनी केले.

कार्यक्रमाला सन्मानार्थी पालकांच्या नातेवाईकांसह सुर्या करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, रोटरी सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या प्रेरणादायी जीवनकथा ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तर मनात अभिमान व आदराची भावना निर्माण झाली.
