डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना दिला उजाळा !
स्वातंत्र्यपूर्व काळातील कोतूळ येथील महिला परिषद
कोतूळ प्रतिनिधी दिनांक 29
अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील कोतुळ गावात स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत महिला परिषद घेण्यात आली होती. या परिषदेनिमित्त बाबासाहेबांच्या आठवणी कोतूळ गावात राहिलेल्या आहेत. बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट देऊन पुन्हा महिला परिषद आणि बाबासाहेबांच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भाऊ दाजी देशमुख पाटील यांच्या आग्रहास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे १९४१ साली कोतुळ येथे महिला परिषद घेण्यासाठी आले होते. त्यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाला होता. डॉ. आंबेडकर यांची भव्य अशी बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. भाऊ दाजी देशमुखांच्या वाड्यावर येताच रामजी संगारे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खांद्यावर घेत वाड्यात झोपाळ्यावर बसून झोके दिले व महिलांनी औक्षण केले होते.

सर्व समाजाला एकाच पंगतीन बसून गोड जेवन देण्याचा निर्णय भाऊ दाजींनी पूर्ण केला. याच इतिहासाला उजाळा देण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी त्याच झोपाळ्यावर बसून जनतेशी संवाद साधत बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

कोतुळ गावात बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. रांगोळी असलेल्या दुतर्फा रस्त्यावरून नागरिकांनी पुष्पवृष्टी करत जय घोष केला. ग्रामपंचायती तर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला. समता सैनिकदल व आदिवासी कर्मचारी महासंघ समितीने त्यांचे स्वागत केले .
कायदेतज्ज्ञ संघराज रूपवते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उत्कर्षा रुपवते यांनी प्रास्ताविका मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकच्या महिला परिषदेला उजाळा दिला. आमदार डॉ. किरण लहामटे,, किसन चव्हाण, दिशा पिंकी शेख, रविंद्र देशमुख, विजय वाकचौरे यांनी मनगते व्यक्त केली .

महाराष्ट्रतील समाजसुधारक डॉक्टरांचा सन्मान प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते स्मृति चिन्ह व संविधान पुस्तिका देऊन करण्यात आला. डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. प्रदिप जोशी, डॉ. संतोष संगारे डॉ शिवाजी सोनवणे, डॉ. राजीव शिंदे, डॉ. भांडकोळी यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. डॉक्टरांनी समाज परिवर्तनासाठी कटिबध्द असावे असे मत संयोजक समितीचे प्रमुख पोपटराव सोनवणे यांनी व्यक्त केले .
यावेळी विद्यार्थींनीचा शालेय साहित्य देत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. चित्रकार गौतम साळवे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे स्केच भेट दिले. यावेळी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पदस्पर्श समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य सुरेश जगधने, नवनाथ वैराळ, प्रविण साळवे, गणेश साळवे, गौतम रोकडे, संदिप बर्वे, प्रसिक सोनवणे, साळवे पेंटर, प्रकाश डोळस, रविद्र देठे, सचिन व अविनाश गायकवाड, जे के वैराळ यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. सुत्रसंचलन पोपटराव सोनवणे / अजय पवार यांनी तर आभार संदिप बर्वे यांनी व्यक्त केले.

