महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना बदडले…
पालकमंत्री विखे पाटील, आमदार खताळ यांच्यासमोरच राडा
संगमनेर प्रतिनिधी दि. 13
मंत्री पदाची संविधानिक शपथ घेतल्यानंतर देखील दोन धर्मीयात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्यासमोरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर नगर परिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर पालकमंत्री व आमदार बाहेर पडत असताना छात्र भारतीचे कार्यकर्ते मंत्रिमंडळातून नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशा घोषणा देत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता “तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आला आहात हिंदूंच्या विरोधी बोलता”, असे म्हणत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री व आमदार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करीत बदडण्यास सुरुवात केली.

पालकमंत्री व आमदार यांच्यासमोर हा प्रकार घडत असताना त्यांना कोणीही अडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीच्या विद्यार्थी नेत्यासह कार्यकर्त्यांना मारहाण केली. तर दुसरीकडे मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाले असून यात मारहाण करताना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहे. मारहाणी दरम्यान कार्यकर्त्यांचे मोबाईल देखील काढून घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
सकाळी घडलेल्या या प्रकारानंतर लगेचच कार्यकर्ते, पदाधिकारी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदविली नव्हती. पोलिसांकडून तक्रार घेतली जात नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
