संगमनेर शिवजयंती बसस्थानकाच्या जागेचा वाद !        अद्याप तोडगा निघाला नाही..

पोलीस आणि प्रशासनावर प्रचंड दबाव…

शिवसेना शिंदे गट व शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांचा वाद विकोपाला…

पोलीस – महसूल – बसस्थानक प्रशासनाची चुप्पी 

संगमनेर प्रतिनिधी दि. 11

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी संगमनेर बसस्थानक आवारातील मोकळी जागा वापरण्यास मिळावी या कळीच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि शिवजन्मोत्सव सोहळा समिती स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका यांच्यातील वाद विकोपाला गेला असून दोन्ही गटात पोलिसांसमक्ष हमरीतुमरी, धराधरी झाल्यानंतर प्रशासन व पोलिसांनी बैठक घेतल्यानंतर सुद्धा तोडगा निघाला नसल्याने या दोन्ही गटांपैकी कोणाला परवानगी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत पोलीस, प्रशासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याने सध्या हे प्रकरण चिघळले आहे.

तिथीनुसार संगमनेरात पूर्वी सर्वजण एकोप्याने शिवजयंती साजरी करत असत. परंतु विधानसभा निवडणुका नंतर नवीन आमदार मिळाल्याने आता शिवजयंतीत गटबाजी आणि राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाले असून देखावा सादर काढण्यासाठी शासनाची जागा मिळवण्यासाठी आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या समोरासमोर चकमकी घडत आहेत. यावर सत्तेच्या प्रचंड दबावाखाली असलेले पोलीस, प्रशासन अक्षरशः हतबल झाले असून अधिकारी कोणाच्या बाजूने निर्णय घ्यावा या पेचात सापडले आहेत. नेत्यांच्या प्रचंड दहशतीमुळे घाबरले देखील आहेत.

वरील शिवजयंती साजरी करणाऱ्या दोन्ही गटाकडून बस स्थानका समोर जागा मिळावी यासाठी अर्ज देऊन आग्रह करण्यात आलेला आहे. दोन्हीही गट जागा मागत असल्याने जागा कोणाला द्यायची याचा वाद वाढला. त्यामुळे प्रकरण प्रशासनाच्या समोर गेले. दोन दिवसापासून यातून समन्वयाने मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरू होता. आजही यासंदर्भात बैठक झाली. मात्र त्यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही. दरम्यान दोन्हीही गट ती जागा मिळवण्यासाठी हट्टाला पेटलेले आहेत. त्यामुळे या जागेवरून शिवजयंती पर्यंत मोठा राडा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दररोज बस स्थानकासमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. हे सर्व पोलिसांसमोर घडत आहे. बस स्थानकासमोरील सर्व मोकळ्या जागेला पोलिसांनी बारगेट लावून बंदिस्त केले असून त्या ठिकाणी पोलीस व्हॅन लावून मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!