संगमनेरात रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटावचा नुसताच गाजा वाजा…
नव्या आमदारांच ऐकणार कोण ?
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 10
संगमनेर शहरातील बस स्थानक ते प्रवरा नदीपर्यंत रस्ता रुंदीकरण करून सुशोभीत करणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. त्यानंतर नवे आमदार अमोल खताळ यांनी बस स्थानक परिसर आणि शहरातील इतर ठिकाणी करण्यात आलेली शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगरपालिकेने सुद्धा देखावा करीत काही दिवस हे अतिक्रमण काढले. पण सध्या रस्ता रुंदीकरणाचे, सुशोभीकरणाचे काम ठप्प असून बस स्थानक परिसर, बीएड कॉलेज परिसर, बस स्थानक ते सह्याद्री कॉलेज पुणे नाशिक रस्ता, शहरातील इतर परिसरातील अतिक्रमण जैसे थे झाले आहे. त्यामुळे फक्त ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ असा प्रकार झाल्याने नव्या आमदारांच ऐकणार कोण ? असा सवाल उपस्थित झाला असून नव्या आमदारांना साहेबांच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नाही असे बोलले जात आहे.

संगमनेर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली असून रस्ता रुंदीकरणाचे कामही कासवगतीने चालू आहे मात्र ते जवळजवळ ठप्प असल्याचे चित्र दिसत आहे. संगमनेर शहरातील तीन बत्ती चौक ते प्रवरा नदी व पंचायत समिती पर्यंतची अतिक्रमणे मोठा गाजावाजा करत काढण्यात आली. तीन बत्ती चौक ते प्रवरा नदी पर्यंतचे अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू मात्र सध्या हे काम अत्यंत हळू गतीने सुरू असून जवळजवळ ठप्प असल्यासारखेच दिसत आहे.

दरम्यान बस स्थानक ते गवंडीपुरा मज्जिद पर्यंत नोंदीनुसार अतिक्रमणच नसल्याची प्रशासकीय माहिती समर आल्याने शहरातील रस्ता रुंदीकरण होणार का नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय दिल्ली नाका परिसरातील रस्ता रुंदीचे करण्याचे कामही सध्या बंदच आहे.
संगमनेर शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वारंवार अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काही दिवसात तीच मंडळी अतिक्रमण बिनधास्तपणे अतिक्रमण करताना दिसतात. शहरात सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आली आहेत.

नव्या आमदारांच ऐकणार कोण ?
आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत विविध खात्यात विविध सूचना केल्या. या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकल्या मात्र त्याच्यावर कारवाई ही थातूरमातूर पद्धतीने केली जात असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. जर आमदार अतिक्रमण होऊ देऊ नका असे नगरपालिकेला, बांधकाम विभागाला सांगत असतील आणि अधिकारी थातूरमातूर कारवाई करून पंधरा दिवसात परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असेल तर आमदारांच ऐकणार कोण असा सवाल उपस्थित झाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना साहेबांचा आदेशच वंदनीय असल्याची चर्चा आहे.

दिखाव्यापूरती कारवाई….
संगमनेर नगरपालिकेची कुठलीही अतिक्रमण हटाओ मोहीम ही दिखाव्या पुरती असते. सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखवत त्रास देण्याचे काम मात्र नगरपालिका बिनधोक पणे बजावते. पण दादागिरी करून रस्त्यांवर फुटपाथवर आणि नगरपालिकेच्या जागांमध्ये जे अतिक्रमण करतात त्यांच्यावर कुठलेही कारवाई करण्याची हिम्मत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह कोणत्याच विभागाची नसते.
