संगमनेरच्या जोशी स्वीट होम ची चौकशी सुरू !
अनेक त्रुटी आढळून आल्या ; अन्न व औषध प्रशासन विभागाचा अहवाल
संगमनेर प्रतिनिधी दिनांक – 15
संगमनेर शहरासह जिल्ह्यात सुप्रसिद्ध असणाऱ्या जोशी स्वीट होम ची अन्न व औषध प्रशासन विभाग, अहिल्यानगर यांच्याकडून चौकशी सुरू आहे. जोशी स्वीट होम च्या संदर्भाने तक्रारी झाल्यानंतर संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील त्यांच्या मुख्य दुकानात तपासणी करण्यात आली व त्यावर अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार ही चौकशी सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.

जोशी स्वीट होम हे विशेषतः जिलेबी, गुलाबजाम आणि मिठ्ठावडा यासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील सर्वच गोड आणि खारामाल संगमनेर शहर आणि तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. राज्यातील संगमनेर मधील रहिवासी देखील जोशी स्वीट होमचे चहाते आहेत. मात्र या दुकानाविषयी अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्यानंतर हे दुकान चर्चेत आले आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जोशी स्वीट होमची तपासणी केली असून या सदर्भात एक सविस्तर अहवाल पाठविण्यात आला आहे. अहवालात अनेक मुद्दे उपस्थित झाले असून या वादग्रस्त मुद्द्यांवर तपासणी सुरू आहे. तसेच येथील मालामध्ये काही भेसळ होते काय याचे देखील नमुने पाठवून त्याचा देखील अहवाल देखील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार असून काही नमुने पुन्हा तपासण्यासाठी घेतले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित दुकानदाराला नोटीस काढून त्रुटींची पूर्तता करण्यास सुचविण्यात आले आहे. अहवालावर सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, अहिल्यानगर यांच्याकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अन्नपदार्थांचे अहवाल प्राप्त झाल्यावर देखील संबंधित स्वीट होम वर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे अन्नसुरक्षा अधिकारी प्र. प. पवार यांनी सांगितले आहे.
