अंगणवाडी कर्मचारी सभेचे कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे ९ फेब्रुवारी ला राज्य अधिवेशन !
संगमनेर दि. 8 प्रतिनिधी —
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभेचे द्वैवार्षिक राज्य अधिवेशन ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे होणार आहे. अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येत कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
संघटनेच्या राज्य अध्यक्षा ॲड. निशाताई शिवूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनासाठी माजी आमदार वैभव नाईक तसेच हिंद मजदुर सभेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष साथी अशोक जाधव उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी द्यावी, ग्रॅच्युइटी मिळावी, योजनाबाह्य कामे लादू नयेत, महाराष्टातील महिलांसाठी सुरक्षीत वातावरण निर्माण करावे, स्मार्ट मीटर योजना रद्द करावी इत्यादी मागण्यांविषयी ठराव करण्यात येणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या सरचिटणीस कमल परुळेकर यांनी दिली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येत कर्मचारी अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिट मे आणि भारती धरत, पुजा घाटकर यांनी दिली आहे.

