नव्या पिढीच्या सशक्त शरीरासाठी व सतेज बुद्धिमत्तेसाठी शक्ती – भक्ति संस्कार संगम प्रकल्पाचे आयोजन

संगमनेरच्या पथदर्शक प्रकल्पात १७५ शाळांसह 20 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

संगमनेर दि. 6 प्रतिनिधी –

संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध असलेल्या गीता परिवाराद्वारे शाळापूर्व व शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना सुसंस्कृत व शक्तिसंपन्न बनवून बलशाली भारत घडविण्यासाठी संगमेर तालुक्यातील शक्ती भक्ति संस्कार संगम प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ते 19 फेब्रुवारी शिवजयंती या कालावधीत संगमनेर तालुक्यातील सुमारे 175 शाळांमधून या प्रकल्पाची कार्यवाही सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक व मानसिक क्षमता वाढविण्यासाठी दररोज श्रीमद् भगवद्गीतेचा बारावा अध्याय आणि बारा सूर्यनमस्कार असा उपक्रम सहभागी शाळांना दिला आहे. सहभागी शाळांचे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. संजय मालपाणी यांनी दिली आहे.

संगमनेरमधील सामाजिक कार्याची आवड असणार्‍या व्यक्तींनी या प्रकल्पात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला असून संगमनेर गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, माध्यमिक विद्यालये, खाजगी शिक्षण संस्था चालक यांचेही उत्तम सहकार्य मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील 175 शाळा व 20000 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.अशी माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ कळसकर गुरुजी, कार्याध्यक्ष डॉ. माणिक शेवाळे, उपाध्यक्ष अरुण महाराज फरगडे यांनी दिली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना योग आणि सूर्यनमस्काराचे शिक्षण दररोज दिले जाते. त्यानुसार शक्ती भक्ति संस्कार संगम प्रकल्पास उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून समाजातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. शिवजयंतीनंतर प्रकल्पाचा समारोप भव्य स्वरूपात केला जाणारा असून त्याप्रसंगी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके बघण्याची संधी संगमनेरकरांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता, आकलन शक्ती व स्मरणशक्ती वृद्धीसाठी व सुडौल व सशक्त शरीरासाठी उपयुक्त असणारा हा प्रकल्प संगमेरसाठी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पथदर्शक राहील.

प्रकल्प यशस्वीतेसाठी प्रकल्पाचे समन्वयक किसन भाऊ हासे, कार्यालय प्रमुख दत्ता भांदुर्गे, अभिजित गाडेकर यांनी व्यक्त केली. माजी प्राचार्य ज्ञानेश्‍वर गोंटे, माजी शिक्षणाधिकारी ज्ञानेश्‍वर वाकचौरे, योग तज्ञ कैलास कानवडे, किरण शिरोळे, मुकुंद डांगे, अरविंद गाडेकर, नारायण उगले, सतीश ढमाले यांच्यासह समिती सदस्य प्रयत्नशील आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!