शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता कार्यशाळा उत्साहात पार पडली

संगमनेर पोलीस उपविभागाचा उपक्रम 

संगमनेर दि. 6 प्रतिनिधी – 

पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलीस उपविभागाच्या वतीने अकोले संगमनेर तालुक्यातील शाळकरी मुला-मुलींसाठी सुरक्षितता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष कार्यशाळे बरोबरच थेट प्रक्षेपणाद्वारे (ऑनलाइन) देखील यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.

या कार्यशाळेमध्ये बालकांबाबत घडणारे गुन्हे, त्याचा प्रतिबंध, स्वसंरक्षण, बालकासंबंधीच्या महत्त्वाच्या कायद्यातील तरतुदी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या दृष्टीने करिअरचे महत्त्व, तसेच पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन करण्यात आले.

सदर कार्यशाळा अकोले तालुक्यातील कळस येथील कळसेश्वर विद्यालयामध्ये घेण्यात आली. ऑनलाइन कार्यशाळेमध्ये विविध प्रकारचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी मदत केली व सदर कार्यक्रमाची लाईव्ह लिंक तयार करून दोन्ही तालुक्यातील सर्व शाळांना पुरविण्यात आली. ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून या दोन्हीही तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक यांना या कार्यक्रमात सहभागी होता आले.

सदर कार्यक्रमास संगमनेर तालुक्यातील 406 शाळांमधील 1551 मुख्याध्यापक शिक्षक तसेच 40 हजार 76 विद्यार्थी त्याचप्रमाणे 2508 पालक ग्रामस्थ हजर होते. तर अकोले तालुक्यातील 283 शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसह 23 हजार 324 विद्यार्थी, पालक पोलीस पाटील ग्रामस्थ हे ऑनलाईन कार्यशाळेसाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे कळस येथील विद्यालयात कार्यक्रमाच्या ठिकाणी 25 शिक्षक 175 विद्यार्थी 25 ग्रामस्थ प्रत्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कळस गावातील पोक्सो तपासाबाबत पोलिसांना मोलाचे सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार देखील करण्यात आला.

अत्यंत उत्साहात आणि महत्त्वाच्या कार्यशाळेत संगमनेर अकोले तालुक्यातील एकूण 689 शाळांनी सहभाग घेतला व त्यामध्ये 1हजार 576 शिक्षक आणि 63 हजार 575 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला कार्यशाळा. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला. त्याचप्रमाणे कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे, तंटामुक्त समितीचे नंदा बिबवे, कळस ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कळसेश्वर विद्यालयच्या सर्व शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे प्रयत्न केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!