बँकिंग व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरे गेले पाहिजे — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर दि. 10
बँकिंग व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरे गेले पाहिजे असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे वार्षिक संमेलनात ते बोलत होते.

थोरात म्हणाले की, बदलत्या बँकिंग व्यवसायाचा सर्वांनी अभ्यास करून येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. सहकारातील बँका या तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असून त्यांचे अस्तित्व टिकणे व त्यांची वाढ होणे हे अत्यंत गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा बँकांमध्ये वापर करून तसेच रिझर्व बँकेच्या विविध आदेशांचा अभ्यास करून पदाधिकारी कर्मचारी यांनी कार्यरत राहावे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संमेलन मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट या ठिकाणी पार पडत असून या संमेलनाचे उदघाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व डाॅ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पार पडले.
या कार्यक्रमासाठी विश्वास सहकारी बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर व त्याचा बँकेमधील वापर या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, जिल्हा सहकार उप निबंधक कोरे, जिल्हा बँक असोसिएशन चेअरमन सत्येन मुंदडा, व्हा. चेअरमन अशोक व्यवहारे तसेच सर्व संचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हा. चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे तसेच संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र वाकचौरे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमनेर मर्चंट बँकेचे विठ्ठल कुलकर्णी यांनी केले. संमेलनामध्ये जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
