महात्मा गांधींचे मानवतावादी मूल्य तरुणांसाठी अनुकरणीय- पद्मश्री इंद्रा उदयन

महात्मा गांधींचा विचार घेऊन गरिबी निर्मूलनात युवकांनी योगदान द्यावे

अमृतवाहिनी व सह्याद्री महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

संगमनेर दि. 10

जगाला शांतता, सत्य आणि अहिसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवता धर्म शिकवला आहे. सध्याच्या भेद वाढवणाऱ्या वातावरणातून सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. चांगल्या समाजासाठी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसेच्या मूल्यांची युवकांनी जपवणूक करावी असे सांगतानाच गरिबी निर्मूलनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन इंडोनेशियातील पद्मश्री इंद्रा उदयन यांनी केले आहे.

सह्याद्री व अमृतवाहिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संवाद साधताना ते बोलत होते यावेळी समवेत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, डॉएम ए वेंकटेश, हिरालाल पगडाल आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

पद्मश्री उदयन म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला शांतीचा मार्ग दाखवला मात्र भारतामध्ये सध्या जातीभेदाचे राजकारण सुरू आहे. त्यामधून मोठी सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. ही चिंता संपवून निरोगी व निकोप समाज निर्मितीसाठी महात्मा गांधींच्या मानवतेचा विचार हा पुढील काळात सर्वांसाठी अनुकरणीय व महत्त्वाचा ठरणार आहे.

महात्मा गांधींनी मानवता हा धर्म सांगितला. शिक्षण हा समाज प्रगतीचा मार्ग असून खेडी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल असे सांगितले. मात्र सध्या काही राजकीय लोक व्यक्ती पूजा करून घेत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

भारताला समृद्ध बलशाली बनवण्यासाठी युवक महत्त्वाचे असून या युवकांनी गांधीजींच्या विचारांचेच अनुकरण केले पाहिजे. जग तुमच्याकडे आदर्श म्हणून पहात आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये संगमनेर मधील सह्याद्री व अमृतवाहिनी मधील विद्यार्थ्यांनी येऊन विचारांची आदान प्रदान करावे यासाठी आपण आग्रह ठेवला आहे.

महाराष्ट्राने देशाला विचारांची दिशा दिली असून नव युवकांनी समाज सुधारक व राष्ट्रपुरुषांची विचार अनुकरण करून पुन्हा एकदा समृद्ध देश निर्मितीसाठी काम करावे असे आवाहन केले.

डॉ तांबे म्हणाले की, महात्मा गांधींचा विचार हा जगाला आदर्शवत आहे. याच विचारांवर पद्मश्री इंद्रा उदयन इंडोनेशियामध्ये काम करत आहेत. जगात गांधी विचारांनी माणसे जोडले जात आहेत. भारतात सुद्धा मानवता धर्म आणखी वाढवण्यासाठी तरुणांनी एकत्र आले पाहिजे. तोडणे सोपे जोडणे अवघड असते आणि म्हणून युवकांनी माणसे जोडण्याची प्रेरणा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारातून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बाळासाहेब वाघ यांनी केले तर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांनी आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!