संगमनेर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
संगमनेर दि. 4
आजच्या युगात स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून या सगळ्या समग्र परिवर्तनाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले यांच्यापासून झाली आहे असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांनी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे, विजय पाटील, डॉ.राजेश्वरी सारस्वत, विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.

लढ्ढा म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्यासाठी त्यांना समाजसुधारक ज्योतिराव फुले यांची महत्वाची साथ लाभली. महिलांसाठी पहिली शाळा सुरु करत असताना त्यांना समाजाच्या पुरोगामी विचारांना सामारे जावे लागले. सावित्रीबाई फुले या फक्त एक समाजसुधारक नसून त्या एक उत्कृष्ट कवियत्रि होत्या. सावित्रीबाई फुले यांनी समाजात असणा-या केशवपनावर बंदी आणली, विनाविधी व हुंडा विरहित विवाह याबाबत जनजागृती केली. त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. महिलांनी चुल व मुल यामध्ये स्त्रीने गुंतून न राहता त्यांनी शिक्षण घेतले पाहीजे. कारण मुलगी, स्त्री शिकली तरच समाजाचे परिवर्तन होईल व कुटूंबाची व देशाची प्रगती होईल. आज समाजामध्ये स्ति्रयांना मानाचे स्थान मिळत आहे, ते आज खुप सहज वाटते, मात्र प्रत्यक्षात या सन्मानामध्ये खरे योगदान आहे ते सावित्रीबाई फुले यांचे. त्या समाजातील रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा झुगारुन स्ति्रयांना शिक्षण देण्यासाठी घराबाहेर पडल्या व मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.त्यामुळे त्यांना त्रासही खुप झाला, मात्र त्या मागे हटल्या नाहीत, त्यांचे कार्य त्यांनी पूर्ण केले. आजच्या मुलींच्या सर्व क्षेत्रांमध्ये मिळविलेल्या यशामुळे त्यांचे स्वप्न आज अखेर पूर्ण झाले आहे.

डॉ. राजेश्वरी ओझा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले या समाजासाठी एक आदर्श असून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरत आहे. त्यामुळे आज विविध क्षेत्रांत महिला मोठ्या सन्मानाने आपले अधिराज्य गाजवित आहेत. ‘स्त्री’ हा समाजातील एक अविभाज्य घटक आहे. स्ति्रयांनी स्वतः आत्मनिर्भर बनुन स्वतःचे स्थान समाजात निर्माण केले पाहिजे. आजच्या काळात समाजात वावरताना कोणत्याही घटनेचा आपण बळी ठरु नये यासाठी त्यांनी शिक्षणाबरोबरच स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम बनणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा आढावा घेत आधुनिक काळात स्त्री-सक्षमीकरणासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच महाविद्यालयीन पातळीवर आपण दरवर्षीच विद्यार्थिनींसाठी ‘निर्भय कन्या अभियान, महिला तक्रार निवारण व विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास असे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनाबाई आभाळे यांनी केले तर आभार कुलसचिव संतोष फापाळे यांनी मानले.

