मालपाणी विद्यालयाच्या १७० विद्यार्थ्यांनी लिहिले आई-बाबांना पत्र
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या प्लास्टिक मुक्ती च्या आवाहनाला मुलांचा प्रतिसाद
संगमनेर दि. 26
शारदा शिक्षण संस्थेच्या मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीच्या 170 विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना ‘प्लास्टिकचा वापर थांबवा आणि आमचे भविष्य वाचवा’ असे आवाहन करणारे भावनिक पत्र लिहिले.

संगमनेर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी श्रीनिवास पगडाल, रत्नाकर पगारे, दिगंबर बंदावणे, अमजद पठाण यांच्या समवेत मालपाणी विद्यालयाच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापर प्रतिबंधाविषयी आवाहन केले. प्लास्टिक वापराने होणारे दुष्परिणाम व त्यासाठी करायच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. प्लास्टिक कचऱ्यासंबंधी वापरा, साठवा आणि हस्तांतरित करा हा मंत्र दिला.

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एक दिवस आपल्या घरातील कचऱ्यात जाणारे सर्व प्लास्टिक साठवून शाळेत जमा करावे असे आवाहन केले. त्याचबरोबर आपल्या पालकांना प्लास्टिक वापरू नये व जे प्लास्टिक टाळता येत नाही असे प्लास्टिक साठवून शाळेत संकलित करण्यासंबंधी जागृती करणारे एक पत्र लेखन करण्याचेही आवाहन केले होते.

रामदास कोकरे यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत मालपाणी विद्यालयातील इयत्ता चौथीच्या 170 विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना प्लास्टिक वापरण्यास व स्वीकारण्यास नकार द्या असे आवाहन करणारे पत्र लिहिले. यातून ज्याप्रमाणे आई-बाबा आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करत असतात, त्याचप्रमाणे आम्हाला भविष्यात स्वच्छ पर्यावरण मिळावे म्हणून प्लास्टिक पिशव्या स्वीकारण्यास नकार द्या. कमीत कमी प्लास्टिक वापरा आणि जे प्लास्टिक वापराल ते योग्य रीतीने कचऱ्यामध्ये जाऊ द्या, असे आवाहन केले.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सुनिता पवार यांनी प्रोत्साहन दिले. तर योगिता गोडे, प्रज्ञा म्हाळस, विजया वाकचौरे, गोरक्ष धाकतोडे यांनी मेहनत घेतली.
