टंचाईग्रस्त नागलवाडी झाली पाण्याची वाडी

अहिल्यानगर दि.६ –

शेवगाव तालुक्यातील नागलवाडी गावाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून टंचाईच्या परिस्थितीवर मात केली आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले गेल्याने रब्बी हंगामासाठी देखील पाणी उपलब्ध झाले आहे.

शेवगाव तालुक्यात डोंगर माथ्यावर नागलवाडी गाव वसलेले आहे. तालुक्यातील कोरडा भाग म्हणून या गावाची ओळख आहे. डोंगर उताराचा भाग असल्याने पावसाचे पाणी खालच्या बाजूस वाहून जाते, त्यामुळे गावाला डिसेंबर अखेरीस पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अडीच हजार लोकसंख्येच्या या गावाने अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीने शिवार फेरीच्या माध्यमातून योजनेअंतर्गत आराखडा निश्चित केला.

डोंगरावरून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी माती नाला बांध आणि दगडी बांध घातले. एका ठिकाणी सिमेंट नाला बांध बांधण्यात आला. कृषी विभागामार्फत २ शेततळे, ११ माती नाला बांधातील गाळ काढणे आणि २ फळबागांची कामे घेण्यात आली. तर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत २ साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती मार्फत वन विभागाने जलसंधारण विभागाच्या सहयोगाने प्रथमच गेटेड साठवण बंधारा बांधण्यात आला त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ४९ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

जलसंधारणाच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी अडविण्यात यश आले, ४० सघमी पाणीसाठा निर्माण झाला. पूर्वी जानेवारी महिन्यातच नाल्यातील पाणी आटत असे. यावर्षी डिसेंबर महिन्यातही बंधाऱ्यात पाणी आहे आणि गावातील विहिरी तसेच विंधन विहिरींनाही पाणी मुबलक प्रमाणात आहे.

गेल्या वर्षापर्यंत गावात केवळ खरीपाचे पीक घेतले जात होते. यावर्षी रब्बीत गहू आणि हरभराची पेरणीदेखील शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी टँकरने पाणी आणण्याची गरज भासणार नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. गावात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. जलसंधारणाची अशीच कामे घेवून यापुढे गाव पाणीदार करण्याचा निश्चयही ग्रामस्थांनी केला आहे.

 

टंचाईग्रस्त गाव ही ओळख पुसण्यासाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरली आहे. यापुढे देखील जलसंधारणाची अशीच कामे घेवून गाव खऱ्या अर्थाने जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न आहे.

किरण जाधव ,सरपंच नागलवडी

डोंगर उताराचा भाग असल्याने गावातील पाणी खालच्या बाजूस वाहून जायचे. खरीपातही पाण्याची समस्या जाणवते. आता मात्र सिमेंट बंधाऱ्याद्वारे पाणी अडविले गेल्याने शेतात गहू आणि हरभरा लावले आहेत. गावातील विहिरींनाही चांगल्या प्रमाणात पाणी आहे.

शिवाजीराव खेडकर, शेतकरी

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!