महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस हा संगमनेर तालुक्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जात असून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर, अपंगांसाठी विविध कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, यांसह विविध रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर तालुक्याचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करत आहेत. राज्य मंत्रिमंडळात कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण, रोहयो, महसूल, खारजमीन अशा विविध मंत्री पदांवर त्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे काम करताना हे खाते लोकाभिमुख बनवले आहेत. पस्तीस वर्षे अविश्रांत काम करताना जनतेच्या सुख – दुःखात सहभागी होणारे व संगमनेर तालुका परिवार मानून सातत्याने काम करणारे थोरात संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहेत.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा थोरात यांच्यावर मोठा विश्वास असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे कायमस्वरूपी सदस्य, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अशा विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी दिल्या आहेत. पक्षाचा मोठा विश्वास, शांत, संयमी स्वभाव, विविध क्षेत्रांची जाण, प्रत्येकाला नावानिशी हाक मारण्याची पद्धत, कामाचा पाठपुरावा आणि अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे युवकांमध्ये ही ते अत्यंत लोकप्रिय आहेत.
त्यांचा वाढदिवस हा संगमनेर तालुक्यात व जिल्ह्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जातो. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार असून महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्यावतीने संगमनेर तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध गावांमध्ये वकृत्व स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, याचबरोबर अपंगांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

तर यशोधन कार्यालयात मूकबधिर विद्यालयाच्या वतीने ९०० युनिक कार्डचे तालुक्यातील दिव्यांगांना वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण तालुक्यात अत्यंत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असून ७ फेब्रुवारी हा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
