संगमनेरच्या वृत्तपत्र विश्वाचा इतिहास काळाच्या पडद्याआड
ब.वि.कुलकर्णी यांचे निधन

संगमनेरच्या वृत्तपत्र क्षेत्राचा चालताबोलता इतिहास म्हणून ओळखले जाणारे बळवंत विठ्ठल (ब.वि.) तथा बाळासाहेब कुलकर्णी यांचे काल रात्री (गुरुवार दि.३/२/२०२२) वृद्धापकाळाने निधन झाले.
ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक विनय गुणे यांनी बाळासाहेब कुलकर्णी यांच्यावर लिहिलेला लेख खाली देत आहोत.
——————
संगमनेरच्या वृत्तपत्राचे विश्व बाळासाहेब कुलकर्णी यांचा खास उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. वृत्तपत्रे आणि बाळासाहेब हे संगमनेरकरांच्या मनात घट्ट रुजलेलं समीकरण आहे..
त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू व्हायचा. सायकल वर पायडल मारत एस टी स्टॅन्ड वर पोहोचायचं.. काही पेपर्सच्या टॅक्सी पार्सल घेऊन आलेल्या असायच्या.. त्यांना पुढच्या डिलिव्हरीसाठी जायची घाई असे, मग भराभर ते गठ्ठे खाली उतरून घ्यायचे. काही पेपरचे गठ्ठे एस टी ने यायचे.. ते उतरून घेण्याचीही घाई असे..
गठ्ठे उतरवायचे, जुळवायचे, पुरवण्या प्रत्येक पेपर मधे टाकायच्या, पेपर वाटणार्या मुलांचे छोटे गठ्ठे त्यांच्या हवाली करायचे, तो पर्यंत चांगलच उजाडायच..
सकाळी सुटणार्या बसेसचे प्रवासी गाडी येईपर्यंत स्टॉल समोर घुटमळायचे.. पेपर घेणाऱ्यांची गर्दीही असायची..एसटी मधे खेडेगावात पाठवायच्या पेपरचे गठ्ठे टाकायचे, स्टॉलवर पेपर विकायचे, वाटणार्या मुलांना रवाना करायचे अशी सगळी सर्कस त्या पहाटेच्या तासाभरात चालत असे..’ सार्वमत पासून टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू आणि भास्कर ‘ पर्यंत सर्व पेपरच्या गठ्ठयात बाळासाहेब बुडून गेलेले असत.
स्टॉलवर थांबायला एखादा सहकारी आला की आपली पेपरची लाईन टाकायला निघायचे..
बाळासाहेब कुलकर्णी यांचा रोजचा दिवस असा सुरू व्हायचा.. त्या घाईच्या वेळेत त्यांना कोणाशी बोलायला वेळ नसायचा.. कोणी निरर्थक वेळ घेतोय असे वाटले तर ते सरळ डाफरायचे..
दुपारनंतर बाळासाहेब जरा निवांत असत.. रोज स्टॉल वर चक्कर टाकणे हे रुटीन होत.. त्यावेळी स्टॉलवर बसून त्यांचे बरोबर बोलता यायच. गप्पा व्हायच्या.. बोलता बोलताही त्यांच काम चालू असायचे, नवीन आलेली साप्ताहिके, मासिके शोकेसमधे लावत, उरलेल्या पेपरचे गठ्ठे करत..कोणत्या अंकात काय वाचायला आहे हे त्यांचे कडून कळे.. मी ‘ माणूस, सोबत, दिनांक ‘ मधे लिहायचो.. माझे लेख आलेले अंक ते काढून ठेवत.. त्याबद्दल बोलायचे. शहरात घडणार्या घटना, घडामोडी सांगायचे.. खूप खुष असले तर कधी कधी चहा सांगायचे.. हे करता करता त्यांनी पेपर वाचलेले असत.. कोणत्या वाचकाला काय आवडेल हे त्यांना चांगलेच माहित होते, त्या त्या वाचकाला समोर बघताच ते अंक त्यांच्या समोर टाकत असत.
वयाच्या अवघ्या तेराव्या, चौदाव्या वर्षी सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस साली सुरू झालेला हा सिलसिला दोन हजार एकोणीस पर्यंत पंचाहत्तर वर्ष अव्याहत चालू होता.. बाळासाहेबांचा व्यवहार चोख असे. त्यामुळे सर्व पेपरवाले त्यांच्यावर खुष असत. त्यांच्यावर पेपरच्या व्यवस्थापनाची मर्जी होती..
बाळासाहेब संघाचे स्वयंसेवक. संघाचे बाहेरून येणारे कार्यकर्ते, प्रचारक आल्यावर आधी बाळासाहेबांना भेटत आणि मगच पुढे जात.
साधा धुवट पायजमा, तसाच धुवट अर्ध्या बाह्यांचा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी अशा वेषात सायकल वरुन जाणारे बाळासाहेब आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहेत..
आत्ता आत्ता दोन वर्षापुर्वी बाळासाहेबांनी आपल्याकडे पेपर टाकणार्या मुलांना आपल्याकडची एजन्सी देऊन टाकली..
सकाळ उजाडता उजाडता पेपर लोकांच्या हातात असायचा. बाळासाहेबांनी लोकांना पेपरची सवय लावली.. बातम्या, घडामोडी, घटनांबद्दल बोलून वाचायची उत्सुकता निर्माण केली.. चांगले अंक कोणते, कोणत्या दिवाळी अंकात काय आहे, कोणत्या नियतकालिकात कोणाचा लेख आहे हे ते आवर्जून सांगायचे..
परवाच्या नातवाच्या लग्नाचा स्वागत समारंभात ते दिसले नाहीत.. तेंव्हाच चुकल्या चुकल्यासारखे वाटले होते..
आज बाळासाहेब अखेरच्या प्रवासाला निघाले आहेत.. त्यांची अखंड, अविश्रांत भ्रमंती आज थांबली आहे.. प्रतिकूल परिस्थितीतही कोणतीही कुरकुर न करता बाळासाहेब आनंदी आणि समाधानी राहिले..
विचार आणि व्यवसाय याबाबत अविचल निष्ठा बाळगणाऱ्या बाळासाहेब यांचे जीवन कृतार्थ झाले आहे.. विजयी झाले आहे..
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
विनय गुणे, संगमनेर
