अहमदनगर जिल्ह्यात “अमृत जवान सन्मान अभियान” राबविण्यात येणार !
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सुरू केलेला उपक्रम…
७ फेब्रुवारी पासून ७५ दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे.
प्रतिनिधी —

देशाच्या तिन्ही सेना दलात असणारे जवान, आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, विधवा या सर्वांसाठी नगर जिल्ह्यात ‘अमृत जवान सन्मान अभियान’ राबविण्यात येणार आहे.
देशासाठी समर्पण करताना आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे अवघड होते. विविध प्रकारची प्रशासकीय कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही. अडचणी असतात. त्यामुळे अशा सैनिकांच्या सन्मानार्थ सर्वांची प्रशासकीय कामे व्यवस्थित वेळेवर व्हावीत म्हणून ही योजना राबवणत येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

सीमेवर तैनात असल्याने व स्वतःच्या गावापासून दूर असल्याने कार्यरत सैनिकांची प्रशासनात अनेक कामे पाठपुराव्याअभावी अथवा वेळे अभावी प्रलंबित असतात. अशा सैनिकांची वैयक्तिक सर्व प्रकारची प्रशासकीय कामे देखील पाठपुराव्या अभावी किंवा मनुष्यबळाअभावी प्रशासनातील कार्यपद्धतीची पुरेशी माहिती नसल्याने प्रलंबित राहतात.
माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे. व करत आहेत. त्यांची सेवा व समर्पण विचारात घेता सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागातील शासकीय कामे जलद रित्या प्राधान्याने निर्गत करण्यासाठी हे अभिनव अभियान राबवण्यात येणार आहे. नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून हे अभियान पार पडणार आहे.

विविध विभागांमध्ये माजी सैनिक शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांची अनेक कामे असतात जसे महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, शेती व बांधकाम परवानगी, भूसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड इत्यादी. पोलिस विभागाकडे विविध तक्रारी, समस्या, समाजकंटकांकडून होणारा त्रास याबाबतच्या तक्रारी, जमीन, जमिनीच्या हद्दी, पाणी या वरून होणारे फौजदारी स्वरूपाचे वाद, ग्राम विभागाकडील विविध योजनांचा लाभ.
ग्रामपंचायत स्तरावरील रहिवास विषयक विविध बाबी इत्यादी. तसेच कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रस्ताव तयार करणे, सरकारी विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागातील परवाने तसेच इतर अनेक विभागाकडील अशा कामांसाठी विशेष मेळावे घेऊन माजी सैनिक, शहीद जवान व सेवेतील कार्यरत सैनिकांचे प्रश्न विशेष प्राधान्याने निर्गत करणे आवश्यक आहे. त्यासाठी हे अभिनव अभियान राबविण्यात येणार असून ‘अमृत जवान सन्मान अभियान’ हे त्यासाठी परिपूर्ण न्याय देऊ शकते.

दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ पासून दिनांक २३ एप्रिल २०२२ असे ७५ दिवसांच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित करून लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभाग प्रमुख व सैनिक अर्जदार यांच्या उपस्थित सर्व विषयांचा समक्ष आढावा घेतला जाणार आहे. तसेच सदर कालावधीत सदर प्रश्नांच्या निरसनासाठी विशेष मिळावे देखील घेतले जाणार आहेत.
यासाठी तालुकास्तरीय समन्वय समित्या स्थापन केल्या जाणार असून या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी असणार आहेत व तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तसेच माजी सैनिक तालुकास्तरीय संघटनेतील एक प्रतिनिधी सदस्य म्हणून या समितीत असणार आहे. प्रशासनाच्या सेवेतील विविध विभागातून यामध्ये सदस्य निवडण्यात येणार आहेत.

तसेच जिल्हास्तरीय समन्वय समिती मध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. यामध्ये सुद्धा जिल्हा पातळीवरील प्रशासकीय विभागातील अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. यामध्ये माजी सैनिक जिल्हा संघटनेचा एक प्रतिनिधी आणि संरक्षण विभागातील एक प्रतिनिधी सदस्य म्हणून असणार आहे.
