सुसंस्कृत तथा संस्कारित संगमनेर शहराचे विद्रुपीकरण थांबवा
बेकायदेशीर होर्डींग,फ्लेक्स बोर्ड हटवा
ॲड. सैफुद्दीन शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्रतिनिधी —
संगमनेर शहरामध्ये नियमांची पायमल्ली करत फ्लेक्सच्या माध्यमातुन विद्रुपीकरण सुरु आहे. सुसंस्कृत शहराचा लौकीक निर्माण झालेल्या शहरातील या विद्रुपीकरणाकडे नगरपालिकेसह संबधीत अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे हे फ्लेक्स हटविण्याची मागणी शहरातील वकील सैफुद्दीन शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व संबधितांकडे केली आहे. फ्लेक्स हटविले न गेल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

शेख यांनी यासंदर्भात संबधितांकडे तक्रार करत नगर पालीका हद्दीमध्ये सार्वजनिक जागा, सार्वजनिक ठिकाणे, वाहतुकीच्या रस्त्यालगत, विज वितरण कंपनीचे विद्युक वाहक पोल, टेलीफोन पोल, वृक्ष, भिंती आदी ठिकाणी बेकायदा, अनधिकृत, विना परवाना जाहीराती, घोषणाफलक, होर्डींग्ज, पोस्टर्स लावण्यात आले आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
तसेच रस्त्यावरील फलकांमुळे अपघातांचीदेखील शक्यता असल्याने यातुन जीवीत हानी होऊ शकते. त्यामुळे हे फ्लेक्स हटविण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी परवानगीशिवाय फ्लेक्स लावले जात असल्याचे सर्रासपणे आढळते.

संगमनेरात अनेक तथाकथित नेते, दादा, भाऊ, साहेब यांच्या वाढदिवसांचे तसेच उपक्रमांचे फ्लेक्स लावलेले आढळतात. वास्तविक अनधिकृत जाहीराती, घोषणाफलक, होर्डींग्ज, पोेस्टर्स आदीसंदर्भात झालेल्या एका जनहित याचिकेत यासंबधी स्पष्टपणे निर्देश दिले गेल्यानंतर राज्य शासनाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलेले आहे. कार्यवाहीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र शहराचे सौदर्य नष्ट करण्यासाठी हातभार लावणारे फ्लेक्स हटविण्याकडे संबधित अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.
शहरात लागलेल्या या भाऊ, दादा, काका, मामा आदींच्या फ्लेक्स, जाहीरात फलकांमुळे संपुर्ण शहराचे सौदर्य नष्ट होत असून यात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, सामाजिक बांधिलकीचा पुढाकार घेतलेल्या अनेक सामाजिक संस्था, त्यांचे पदाधिकारी आदीच्या वाढदिवस, नेत्यांचे, नेत्यांच्या कुटूंबियांचे वाढदिवसाचे शुभेच्छापर फ्लेक्स, पोस्टर्स, व्यावसाईक जाहिराती लावत शहराचे विद्रुपीकरणात हातभार लावला जात आहे. मुख्याधिकाऱ्यांनी हे फ्लेक्स न हटविल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे

यातील महत्वाची बाब म्हणजे आपण किती निष्ठावान आहोत याची आपल्या नेत्यावर छाप पाडण्यासाठी चढाओढ सुरू आहे. संपूर्ण शहरात लाभार्थ्यांनी हा गोंधळ घालून ठेवला आहे. संगमनेर शहरातील विविध चौकात असे फ्लेक्स लावले जातात. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या सह्याद्री विद्यालयासमोरील मार्गावर, बसस्थानक परिसर, नवीन नगर रोड, रंगारगल्ली, दिल्ली नाका, सय्यद बाबा चौक परिसर, तीन बत्ती चौक परिसर, बी एड कॉलेज सर्कल, अकोले बायपास सर्कल अशा ठिकाणी फलकांची दररोज चढाओढ बघायला मिळते.
अनेकदा तर एका फ्लेक्सवर दुसरा फ्लेक्स लावला जातो. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या फलकांसाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसते. नेत्यांचे फोटो त्यावर झळकावत एकप्रकारे संबधित कार्यकर्ते प्रशासनाला दमबाजीच करत असतात. त्यामुळे हा परिसर फ्लेक्सच्या भाऊगर्दीत पुर्णत: हरविलेला दिसतो. नेत्यांच्या फ्लेक्सवरील फोटोमुळे अधिकारीदेखील हे फ्लेक्स हटविण्याची तसदी घेत नाहीत.
