संगमनेरात विकासाचा नुसता धुडगूस !
सर्व काही आलबेल आहे !!

प्रतिनधी —
सध्या संगमनेर तालुक्यात विकासाचे पर्व सुरू असल्याचे सर्व प्रकारच्या समाज माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे.
संगमनेर तालुक्यात असलेल्या सर्व सहकारी संस्था, अशासकीय संस्था, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, सर्व सरकारी कार्यालये फक्त विकासावरच तुटून पडलेले असल्यामुळे संगमनेर तालुक्यात मोठा विकास चालू असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे संगमनेर तालुक्यात विकास सोडून दुसरे काही होतच नाही. सर्व काही आलबेल आहे. कोणतीही समस्या उरलेली नाही अशी विकसित अवस्था सर्व नागरिकांसह समाजाची झालेली आहे.

संगमनेर शहराचे पोलीस खाते, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, वनखाते, ग्रामीण पोलीस, पर्यावरण विभाग, उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, सहकार निबंधक, दुय्यम निबंधक अशी व अनेक विविध खाती आहेत. ही सर्व विकासाच्या मागे लागल्याने संगमनेर मध्ये सर्व आलबेल आहे.
संगमनेर तालुक्यात शहरात सध्या कुठेही कसल्याही प्रकारच्या अगदी छोट्या-मोठ्या देखील चोर्या होत नाहीत. संगमनेर शहर व तालुक्यात जुगार, मटका, गांजा, गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक, हाणामाऱ्या, भांडणे वाळूतस्करी, गौण खनिजाची चोरी, अवैध दारू विक्री असले कुठलेही वाईट प्रकार होत नाहीत.

संगमनेर तालुक्यात भ्रष्टाचार तर नावाला उरलेला नाही. विविध विकास कामांचा दर्जा तर अतिशय उत्कृष्ट राखला जातो. याबाबत कोणाचीही कुठलीही तक्रार नसल्याचे दिसत आहे. नगरपालिकेचेही काम अत्यंत जोरदारपणे चालू असल्याचे दाखवण्यात येत आहे. नगरपालिकेचे एक बोगस टेंडर प्रकरण वगळता नगरपालिकेने सर्व शहरात विकासाचा घातलेला धुडगूस जबरदस्त आहे. संगमनेर शहर व तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न संपलेला आहे. सामाजिक प्रश्न संपलेले आहेत. सर्वसामान्यांचे रोजचे जीवन मरणाचे प्रश्न संपलेले आहेत. फक्त विकासाचे पर्व सुरू झाले आहे.
संगमनेर तालुका भरभराटीला आलेला आहे. आणि अगदी तळापासून थेट श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच भले झाले असल्याचे चित्र आपणास पहावयास मिळते. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील जनता या विकास पर्वात अत्यंत उत्साहाने न्हाऊन निघाली असल्याचे चित्र आहे. महसूल विभागाचे कामकाज अत्यंत जोरात सुरू आहे. कोणालाही त्रास होत नाही. लोकांची फसवणूक होत नाही. सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेच्या बाबतीतही कसलीच तक्रार नाही.

शैक्षणिक क्षेत्रात पालकांची, विद्यार्थ्यांची कुठलीही आर्थिक पिळवणूक होत नाही. गोरगरिबां सह श्रीमंतांचे शिक्षण अक्षरशः खर्चिक आणि चैनीत सुरू आहे. कोणालाही त्याचा त्रास होत नाही. शेतकरी, कामगार जोरात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मजा आहे. शेतमजूर, हातावर पोट भरणारे, रोजंदारीवरचे कामगार संध्याकाळची मजुरी मिळाल्यानंतर सर्व उड्या मारत घरी येतात. सर्वत्र आनंदाचे आणि सुखाचे समाधानाचे वातावरण आहे.
असे असताना देखील संगमनेरचे विरोधक विनाकारण बदनामी करत असतात. सुसंस्कृत आणि त्याचबरोबर संस्कारित संगमनेर मध्ये मिठाचा खडा टाकायच काम करतात. त्यांना पूर्वेकडून रसद मिळत असते. त्यामुळे ते सत्ताधारी मंडळींना नाहक विरोध करत असल्याचे आरोप होत असतात. पूर्वेकडचे वारे संगमनेरात घुसून अधून मधून छोटी मोठी वावटळ निर्माण करत असते. सुसंस्कृत आणि अतिशय सांस्कृतिक आणि प्रेमळ राजकारणाने भारावलेला संगमनेर शहर व तालुका शेजाऱ्या पाजणाऱ्यांना बघवत नाही. हे काही योग्य नाही.

अशाप्रकारे सुख शांती ने समृद्ध झालेल्या सुसंस्कृत आणि त्याचबरोबर संस्कारित संगमनेर तालुक्याला कोणाचीही नजर लागू नये हीच प्रार्थना….
