संगमनेर तालुक्याची फाळणी…
उद्योग करायला विखे पाटील सारवा – सारव करायला आमदार खताळ पाटील
अपर तहसील कार्यालय ; सर्वसामान्य जनतेच्या तिखट प्रतिक्रिया
संगमनेर दि. 30 प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्याची फाळणी करून आश्वी येथे नवीन अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर संगमनेर तालुक्यात मोठा गदारोळ उडालेला आहे. जनतेला अंधारात ठेवत असा निर्णय घेतल्याने संतप्त जनतेला उत्तर देण्यासाठी आता आमदार अमोल खताळ पाटील यांना पुढाकार घ्यावा लागला असून हा प्रस्ताव अंतिम नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार खताळ यांच्या खुलाश्यानंतर असे वादग्रस्त उद्योग करायला आणि संगमनेरला अडचणीत आणायला विखे पाटील पुढे नंतर अडचण निर्माण झाल्यावर सारवा – सारव करायला आमदार अमोल खताळ पाटील यांचा वापर केला जात आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

मुळात संगमनेर तालुक्याची फाळणी करून आश्वी येथे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना या तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात तीन ठिकाणी अशी तहसील कार्यालये तयार करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आले. त्यात संगमनेर तालुक्यातील निर्णय वादग्रस्त झाल्याने आणि राजकीय हेतूने काही गावांच्या निवडीचे घोळ केल्याने व कारण नसताना संगमनेर तालुक्याची फाळणी करून दोन प्रशासकीय सत्ता केंद्र निर्माण करण्यामागचा राजकीय हेतू असल्याचा आरोप झाल्याने मंत्री विखे पाटलांवर टीका होऊ लागली.

सोशल मीडिया मधून विविध प्रकारे आणि आक्रमक टीका झाल्यानंतर आणि संतप्त नागरिकांनी थेट विखे पाटलांवर निशाणा साधल्यानंतर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या प्रस्तावा बाबत आपले मत व्यक्त केले केले असून हा प्रस्ताव अंतिम नसल्याचे म्हटले आहे. नागरिकांना अंधारात ठेवून कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

