हा तर तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला ! या कारस्थानामागे विखे पाटील ?  

संगमनेर तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही — माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा

जनतेला वेठीस धरण्यासाठीच दुसऱ्या तहसील कार्यालयाची तयारी

संगमनेर दि. 29 — प्रतिनिधी

संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी जनतेची एकजूट मोडण्यासाठी पूर्णपणे राजकीय उद्देश ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा तालुक्यातील जनतेच्या अस्मितेवर घाला आहे. प्रस्तावित विभाजन हे राजकीय हेतू ठेवून करण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांचा असून संगमनेर तालुक्याची मोडतोड कदापिही सहन करणार नाही असा गर्भित इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यकर्ते व प्रशासनाला दिला आहे.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब.2022 /प्रक्र. 94/म -10, दिनांक 17 जानेवारी 2023 या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. हा अध्यादेश पूर्णपणे राजकीय दबावाखाली काढण्यात आलेला आहे. खरे तर संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही संगमनेर शहर हे मध्यवर्ती असल्याने सर्वांच्या सोयीचे आहे. याचबरोबर शहरात मध्यवर्ती असे भव्य तहसील व प्रांताधिकारी कार्यालय आहे. मात्र प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा डाव आखला जात असून हा जनतेचा घात केला जात आहे, तो कदापिही सहन केला जाणार नाही असे थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेली गावे देखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास आणि गैरसोय होणार आहे. तालुक्यातील जनतेला राजकीय दबावातून जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सहन करणार नाही. हा स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका असल्याने या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जन आंदोलन उभारले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

हा अध्यादेश कळताच सर्व गावांमध्ये संतापाची मोठी लाट निर्माण झाली आहे. संगमनेरचा विकास मोडणाऱ्यांनी डाव साधला अशी भावना संगमनेर तालुक्यात निर्माण झाली असून या कुटील कारस्थानाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा गावागावातून दिला गेला आहे.

 

या कारस्थानामागे विखे पाटील ?

संगमनेर तालुक्याची मोडतोड करून विकसित आणि सुसंस्कृत तालुक्याला आणि येथील ‘नागरिकांना देशोधडीला लावण्याचा उद्योग’ हा माजी महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून केला जात असल्याचा थेट आरोप जनतेमधून होत आहे. विखे पाटील यांच्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून हा प्रकार म्हणजे जनतेवर सूड उगवल्यासारखे आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून वाड्याचे महत्व वाढवण्यासाठी असा डाव प्रशासनाला हाताशी धरून केला जात असल्याच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. संतप्त नागरिक यावरूनही तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत असून विखे पाटलांविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!