संगमनेर टोलनाक्याचे नागपूर कनेक्शन….
भाजप नेता कॉन्ट्रॅक्टर ; अमर कतारी यांचा आरोप
संगमनेरचा (हिवरगाव पावसा पुणे नाशिक महामार्ग) वादग्रस्त टोल नाका बंद होण्याची आशा मावळली… टोल ठेकेदाराचे भाजप कनेक्शन… शिवसेना पदाधिकाऱ्याचा आरोप
संगमनेर दि. 8
गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेला संगमनेरचा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चा नंतर सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे टोल नाका बंद होण्याची आशा मावळली आहे. तसेच या टोल नाक्याच्या ठेकेदाराचे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे.

समाज माध्यमात एका पोस्टच्या माध्यमातून कतारी यांनी याचा उलगडा केला आहे. कोणी कितीही आरडाओरडा केला तरी हा टोल बंद होऊ शकत नाही. भाजप-शिवसेनेशी (शिंदे गट) संबंधित आंदोलकांना थेट नागपूरहून फोन आल्याने या कार्यकर्ते, आंदोलकांचा टोल नाक्या विरोधातील आवाज बंद झाला आहे. त्यामुळे संगमनेरात या टोलनाक्यावरून मोठे वादंग होऊन देखील टोल नाका बंद करण्याची मागणी करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा टोल नाका बंद होणार नसल्याने हिरमोड झाला आहे.

या टोलनाक्याचा ठेकेदार नागपूरचा भाजपशी संबंधित नेता असून त्याची भागीदारी शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी आमदार सोबत असल्याचे त्यांनी म्हटले असून यासंदर्भात जर कोणाला खात्री करावयाची असेल तर त्यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे खरे कायदे कळेल.

काही दिवसांपूर्वी या टोल नाक्यावर नाका कर्मचाऱ्यांकडून भाजपाशी संबंधित कासट बंधू आणि त्यांच्या मित्राला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद ठरल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी व्यापारी असोसिएशनसह विविध संस्था संघटना आणि संगमनेरकरांनी प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. संबंधितांवर कारवाई आणि आठ दिवसात टोल नाका बंद अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली होती.

विशेष म्हणजे मोर्चामध्ये संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते. खताळ हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असल्याने आणि या दोन्ही आमदारांनी आक्रमकपणे टोल नाक्याविरोधात भाष्य केल्याने संबंधितांवर कारवाईसोबतच टोल नाका बंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

त्यातच आता राज्य सरकारने येत्या एक एप्रिल पासून सर्व वाहनांना फास्टटॅग अनिवार्य केल्याने हाच नियम या टोलनाक्यालाही लागू होणार असल्याने टोल नाका बंद होण्याची आशा आता मावळली. त्यामुळे संगमनेरकरांच्या या आंदोलनाला सरकारच्या लेखी किंमत नसल्याचे देखील समोर आले आहे.
संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या या आरोपामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या टोल नाक्याला आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना नेमकं कोण पाठीशी घालत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

