खताळ समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत चांगलीच जुंपली !
पदाधिकाऱ्याच्या कानफटात मारल्याने आमदार खताळ समर्थक व संगमनेर भाजपचा वाद चव्हाट्यावर
संगमनेर दि. 3
सोशल मीडियामध्ये केलेल्या पोस्टवरून संगमनेरचे (शिवसेना शिंदे गट) नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. काल या ठिणगीचे आगीत रूपांतर होऊन शासकीय विश्रामगृहावर केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार खताळ समर्थकाने भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याच्या कानफाटात मारल्याने भाजप व खताळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समजली असून या घटनेची उलट सुलट चर्चा शहरामध्ये आणि सोशल मीडियावर सुरू आहे.

मंत्री विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि खास कार्यकर्ते असलेल्या अमोल खताळ यांना विखे यांच्यामुळे आमदार पदाची लॉटरी लागली. खताळ यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळाली त्यामुळे संगमनेर मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला आणि अनेक वर्षानंतर आमदारकीचे मिळणारी संधी देखील भाजपच्या हातातून निघून गेली. शिवाय अनेक गुप्त कारणांमुळे निवडणूकित आमदार अमोल खताळ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू होती. सोशल मीडियातून देखील या संदर्भाने एकमेकांवर टीका केली जात होती. काल त्याचे रूपांतर धुमश्चचक्रीत झाले.

काल रात्री केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन संगमनेर येथे विश्रामगृहावर आले होते. त्यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकर्ते आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर सोशल मीडियातील वादाचा विषय छेडला गेल्याने दोन्ही गटाकडून जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. या शाब्दिक चकमकीचे रूपांतर एकमेकांना धक्काबुक्की झाले. आणि खताळ यांच्या एका समर्थकाने भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कानफटात लगावली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले.

झाल्या प्रकरणी भाजप गंभीर…
दरम्यान आज सकाळी भाजपच्या काही खास पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून घडलेला प्रकार अत्यंत गांभीर्याने घेण्यात आला आहे. या सर्व प्रकाराची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेली आहे. त्यांनी देखील या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर येथे येणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या बोलीवर दिली आहे.

हाती आला भोपळा…
अनेक वर्ष संगमनेर मध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विरोध करत भाजपने भक्कम पाय रोवले होते. या निवडणुकीत तरी भाजपला यश मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार संगमनेर मध्ये होईल अशी चिन्हे दिसत असतानाच अचानक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अमोल खताळ यांना एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी मिळाली आणि आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. आमच्या कष्टावर आयत्या बिळावर रेघोट्या ओढल्या जात आहेत. अशा प्रतिक्रिया भाजप निष्ठावंतांकडून ऐकण्यास मिळतात.

