कुरण रोड परिसरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट ; नागरिक हैराण
बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
संगमनेर दि. 19
शहर प्रतिनिधी – मोहसीन रशीद शेख
संगमनेर शहरातील कुरणरोड परिसरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला असून या मोकाट डुकरांमुळे कुरणरोड परिसरात दहशतीचे वातावरण झाले आहे. तसेच येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाढत आहे.

कुरणरोड परिसरातील या मोकाट डुकरांच्या सुळसुळाटाने नागरिक त्रस्त झाले असून संगमनेर ते कुरण या मुख्य रस्त्यावर ही मोकाट डुकरे दुचाकी व वाहनांना आडवे सैरावैरा पळतांना दिसतात. यामुळे छोट्या मोठ्या अपघाताचा धोका संभवतो.

तसेच परिसरात व पुनर्वसन कॉलनी भागात यांचा मुक्त वावर असल्याने लहान मुलांवर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही व तेथील नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. या मोकाट डुकरांमुळे नागरिक हैराण झाले असून सदरील मोकाट डुकरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

