‘समृद्ध जंगल-समृद्ध जीवन’ अभियाना अंतर्गत किसान सभेची हिरडा वृक्ष संवर्धन मोहीम
अकोले दि. 13
आदिवासी भागात जंगले समृद्ध व्हावीत, आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पर्यावरण रक्षण व्हावे यासाठी किसान सभेच्या वतीने आदिवासी विभागात ‘समृद्ध जंगल-समृद्ध जीवन’ अभियान सुरु करण्यात आले आहे. अकोले तालुक्यात या अंतर्गत हिरडा वृक्ष संवर्धन मोहिमेला चालना देण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीने घेण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील जंगल विभागात विविध बहुवर्षीय वृक्षांच्या बरोबरच हिरडा ही औषधी वनस्पती आढळून येते. विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये हिरडा झाडांची संख्या सातत्याने कमी होऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेने गेल्या काही वर्षांपासून हिरडा झाडे वाचली पाहिजेत तसेच नवी हिरडा रोपे लावली पाहिजेत याबाबत आग्रहपूर्वक मोहिमा चालविल्या आहेत.

आदिवासी विभागात हिरडा वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक आहेच, शिवाय आदिवासी शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचे साधन म्हणून सुद्धा हिरडा झाडे अत्यंत उपयुक्त आहेत. मागील वर्षी हिरडा रोपे उपलब्ध झाली. परिणामी या मोहिमेच्या अंतर्गत हिरड्याची झाडे लावता आली. पुढील पावसाळ्यातही ही रोपी उपलब्ध व्हावीत यासाठी रोपे तयार करण्याचे नियोजन आत्तापासून करणे आवश्यक आहे. यासाठी नगर जिल्ह्यात वन विभागाच्या सर्व रोप वाटिकांमध्ये हिरडा रोपे तयार केली जावीत व वनांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधांवर ज्या भागात हिरडा येतो तेथे हिरडा रोपे लागवडीचे नियोजन व्हावे अशी मागणी किसान सभेने वन विभागाकडे केली आहे.

आदिवासी भागातील शेतकऱ्यांना हिरडा रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून सध्या रानात उपलब्ध असलेल्या हिरडा बियांचे संकलन व जतन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हिरडा रोपे तयार करण्यापूर्वी बियांवर प्रक्रिया करावी लागते. हिरडा बियांची उगवण क्षमता कमी असल्याने रोपे तयार करताना काळजी घ्यावी लागती. किसान सभेच्या वतीने यासाठी गाववार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत. हिरडा वृक्ष लागवड व संवर्धना बरोबरच पर्यावरण रक्षण व आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्धनासाठी इतरही उपाय किसान सभेच्या वतीने करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अशी माहिती सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, राजाराम गंभिरे, भीमा मुठे, शिवराम लहामटे काशिनाथ गांगड, गणपत मधेपांडुरंग, गीऱ्हे यांनी दिली आहे.

