संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा
प्रलंबित प्रकरणे मार्गी तातडीने मार्गी लावण्याची काँग्रेसची मागणी
संगमनेर दि. 24
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी विविध गावांमधील योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून तयार करण्यात आलेली अनेक प्रकरणे प्रलंबित असून ती तात्काळ मार्गी लावून तालुक्यातील निराधार, वृद्ध व गोरगरीब, नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी कार्यालय येथे काँग्रेसने विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे याकरता निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, नितीन अभंग, किशोर पवार, गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री, जालिंदर लहामगे, विजय उदावंत, दशरथ भुजबळ, रमेश नेहे, संजय कानवडे, सुभाष दिघे, सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, किशोर बोऱ्हाडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांमध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवली गेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील वृद्ध नागरिक, निराधार गोरगरीब यांचे मोठे हाल झाले आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध योजना यामधील अनेक प्रकरणे प्रलंबित असून तातडीने ही सर्व प्रकरणे मंजूर करावीत. त्याचप्रमाणे या प्रकरणांच्या कामी दाखल्याची अट 21 हजारांवरून 50 हजार रुपये करण्यात यावी. त्यामुळे वंचित असलेल्या लाभार्थी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडीअडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत होईल.

यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, समाजातील निराधार, अपंग, वृद्ध व्यक्तींना औषध उपचाराची गरज असते आणि त्याकरता या योजना त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनांमधून लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्याने या नागरिकांची हाल होत आहेत. तरी तातडीने सर्व प्रकरणे मंजूर करावी अशी मागणी त्यांनी केली.
तर संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष गजेंद्र अभंग म्हणाले की, संजय गांधी योजनेचे साडेनऊशे प्रकरणे प्रलंबित आहेत. ती तातडीने मंजूर करून निराधार व्यक्तींना लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

