संगमनेर शहर व तालुक्यातील…

सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांवर आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

मुस्लिम समाजातील तरुणांचे पोलिसांना निवेदन 

संगमनेर दि. 18

संगमनेर शहर आणि तालुक्यातील शांतता प्रिय नागरिकांना वेठीस धरत सलोख्याचे सामाजिक, राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी युट्युब वरील अनधिकृत वृत्त चॅनलला हाताशी धरून खोट्या बातम्या प्रसिद्ध करून दोन धर्मात तेढ निर्माण करीत आहेत. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने संगमनेर शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर संगमनेर शहरात अनेक वेळा धार्मिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण होईल अशी कृत्ये झाली. या संदर्भात अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले. दोन्हीकडच्या मंडळींवर गुन्हे दाखल होऊन कायदेशीर कारवाया करण्यात आल्या. अनेक वेळा संगमनेरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. थेट पोलीस अधीक्षकांना देखील हस्तक्षेप करीत संगमनेरात शांतता राखण्यासाठी यावे लागले होते. अशा अनेक घटना घडल्यानंतर आता निवडणुकीनंतर पुन्हा धार्मिक वाद आणि किरकोळ घटनांवरून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

या संदर्भाने मुस्लिम समाजाच्या वतीने संगमनेर शहर पोलिसांना एक निवेदन देण्यात आले असून यामध्ये संगमनेर शहराचा धार्मिक, जातीय सलोखा, सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी युट्युब वर चालणाऱ्या बेकायदेशीर चॅनलला देखील हाताशी धरून खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे म्हटले आहे.

अगदी किरकोळ घटनांना देखील धार्मिक आणि जातीय स्वरूप देऊन त्यातून राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी शहराची शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लिम समाजातील लोकांना मारून टाकण्याच्या, गाडून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यासाठी लांडे, लुंगिवाले, दाढीवाले अपमानास्पद शब्द वापरले जात आहेत. सरळ सरळ मारण्याच्य धमक्या दिल्या जात असल्या तरी अशा व्यक्तींवर कुठलीही कारवाई होत नाही.

प्रसारमाध्यमातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्याची सुद्धा तक्रार पोलिसांनी घ्यायला हवी, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. आपण लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा देखील आदर करून आपण योग्य ती कारवाई करावी असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर वसीम नूरमोहम्मद शेख, नूर मोहम्मद पीरमोहम्मद शेख, रिजवान अब्दुल वाहिद शेख, आरिफ कादिर देशमुख, मुजीब खान अब्दुल्लाह खान, मुजम्मीक शकूर शेख, शौकत युनूस पठाण, जमीर गफ्फार शेख आदींच्या प्रतिनिधिक स्वरूपात सह्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!