एसटीपी प्लांट मुस्लिमांच्या वस्तीत करणे हा सत्ताधाऱ्यांचा हट्ट — सुजात आंबेडकर
संगमनेर मध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा
प्रतिनिधी —
जिल्ह्यात, तालुक्यात कुठेही पाणी साफ करण्याचा एसटीपी प्लांट उभा करता आला असता मात्र प्रस्थापितांचा हट्ट होता की हा केमिकलचा प्लांट फक्त मुसलमानांच्या वस्तीमध्ये करायचा असा आरोप करीत आयुष्यभर आपण यांना मते दिली त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले याचा विचार करून या विरोधात अजीज वोहरा यांनी आवाज उठवला असे सांगत आता वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केले आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांच्यासह जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी संगमनेरमध्ये सुजात आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्ष रूपवते, दिशा शेख, संगमनेरचे उमेदवार अजीज वोहरा, शिर्डीचे उमेदवार राजूभाई शेख, कोपरगावचे उमेदवार शकील चोपदार, श्रीरामपूरचे उमेदवार अण्णासाहेब मोहन, नेवासाचे उमेदवार पोपटराव सरोदे, नगर दक्षिणचे उमेदवार हनीफ शेख राहुरीचे उमेदवार अनिल जाधव उपस्थित होते.

येथे काही लोकांचा असा समज झाला आहे की, त्यांचा जन्म हा राज्य करायला, तुमच्या डोक्यावर बसायला, बँका, साखर कारखाने, लोकांच्या जमिनी, लोकांचे धंदे, दूध डेअरी, सहकार बँका स्वतःच्या खिशात टाकण्यासाठी झाला आहे. मात्र आता तुम्हाला हे ठरवावे लागेल तुमचा जन्म स्वतःला सिद्ध करण्यासाठी झाला की प्रस्थापितांच्या पोरांची मक्तेदारी चालविण्यासाठी, यांच्या सतरंज्या उचलण्यासाठी झाला आहे का? असा सवाल करत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. इतके दिवस एकच खानावळ होती आता मात्र आपल्याला स्वतःची खानावळ सुरू करावी लागेल वंचितची खानावळ सुरू करण्याची वेळ आल्याचेही आंबेडकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, संगमनेरमध्ये घराणेशाही सुरू आहे. दुसऱ्याच्या फेकलेल्या भाकरीवर जगायचे नसेल तर आपलाच वाढपी आणि आपलंच ताट आपल्याला निर्माण कराव लागेल. म्हणजेच स्वतःच्या हक्काच्या मालकीची एक सत्ता उभी करावी लागेल, त्यासाठी आपल्या हक्काच्या माणसांना मतदान करा.

विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने अल्पसंख्यांक संरक्षण आणि हेट स्पीच विरोधात मोहम्मद पैगंबर नावाचे बिल ठेवले होते. वंचितच्या आमदाराच्या माध्यमातून हे बिल पुन्हा सभागृहात आणून मंजूर केले जाईल. सभागृहात हे बिल पास झाले असते तर त्या दीड फुट्याची, गिरीराज महाराज, कालीचरण महाराज यांची काहीही बोलण्याची हिंमत झाली नसती. राहुरीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या सभेत भाषण करताना दीड फुट्या राणे याने मुस्लिमांच्या विरोधात भाष्य केले त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद दिसू लागले. टिपू सुलतानची प्रतिमा दिली तरी पोलीस घरातून उचलून नेत होते. मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनी अफजल खानाच्या कबरीवर चादर चढविल्यानंतर हे प्रकरण थांबले असल्याचे ते म्हणाले.

लोकसभेत भाजपाला हरविण्यासाठी इंडिया अलायन्स ठरलं होतं. राज्यात इंडिया अलायन्सचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले. मात्र एससी एसटी ॲक्ट, क्रिमिलियरचा, वक्फ बोर्डचा मुद्दा समोर आला तेव्हा यातील एकानेही आवाज उठविला नाही. त्यामुळे आज वंचित हाच सर्वांसमोर एकमेव पर्याय आहे.

दिशा शेख म्हणाल्या की, काँग्रेसने आतापर्यंत विधानसभेला या गावात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. आपण लोकशाहीमध्ये आहोत राजेशाहीमध्ये नाही. मात्र तुम्ही आजही गुलामी करीत आहात. नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली मात्र ही कारखानदारी बंद पाडत स्वतःचे खाजगी कारखाने कोणी सुरू केले असा सवाल केला. साखरेच्या शेतीतील आमदार, खासदार बुजगावणे आहेत. एक बाळासाहेब स्वतःच्या मुलीला आमदार बनवू इच्छितो तर दुसरे बाळासाहेब तुमच्या मुलाला आमदार बनविण्यासाठी निघाले आहे. तुम्ही कोणाला निवडणार, असा सवाल उपस्थित केला.
७५ वर्षांमध्ये तृतीयपंथीयाला कोणीही उमेदवारी दिली नाही. एकट्या बाळासाहेब आंबेडकरांनी रावेर मतदार संघातून तृतीय पंथीयाला उमेदवारी दिली. या व्यासपीठावरून एक तृतीयपंथीय मोठ्या नेत्यांना चॅलेंज करते ही केवळ आंबेडकरांची किमया असल्याचे त्यांनी सांगितले.

